17/10/2026
🙏 स्वामींची लीला अगाध आहे! — एक अविस्मरणीय सत्य अनुभव
श्री स्वामी समर्थ 🙏
दिनांक : १० ऑक्टोबर २०२६
काही प्रसंग आपल्या आयुष्यात असे घडतात, की त्या क्षणी आपल्याला त्यांचा अर्थ समजत नाही; पण नंतर मागे वळून पाहिल्यावर जाणवते की, त्या कठीण प्रसंगातही कोणीतरी अदृश्य शक्ती आपल्या पाठीशी उभी होती. माझ्यासोबत १० ऑक्टोबर २०२४ रोजी घडलेला हा अनुभव माझ्यासाठी असाच एक अविस्मरणीय प्रसंग आहे.
त्या दिवशी मला पुण्याहून माझ्या गावी, कुरुंदवाडला जायचे होते. ऑफिसमधील कामे आटोपून मी प्रवासाला निघालो. प्रवासाचा मार्ग थोडा अडचणीचा होता. विशेषतः सांगली आणि जयसिंगपूर परिसरात पहाटे २.०० ते ६.०० च्या वेळी पुढील प्रवासासाठी वाहन मिळणे कठीण असते(मिळतच नाही), याची मला कल्पना होती. तरीही मनात श्री स्वामी समर्थांचे स्मरण करत मी पुढे निघालो.
ऑफिसमधील कामे संपवल्यानंतर माझ्या मागे असलेल्या स्वामींच्या प्रतिमेसमोर मी मनोभावे नमस्कार केला आणि स्वामींना मनातील भावना सांगितल्या.
“स्वामी, मला माझ्या गावी जायचे आहे. पुढचा मार्ग आता तुम्हीच दाखवा. मला कुठे घेऊन जायचे, कसे पोहोचवायचे, हे सर्व तुमच्यावर सोपवतो. श्री स्वामी समर्थ!”
असे म्हणून मी स्वामींचे दर्शन घेतले आणि मिळेल त्या बसने गावी जाण्याचा निर्णय घेतला.
रात्रीचा प्रवास करत अखेर पहाटे साधारण २:३० वाजता मी सांगली बसस्थानकावर पोहोचलो. त्या वेळी सर्वत्र शांतता होती. पुढे जाण्यासाठी कोणते वाहन मिळेल, याची खात्री नव्हती. पहाटेची वेळ, अनोळखी परिस्थिती आणि गावी पोहोचण्याची ओढ यामुळे मनात अनेक विचार सुरू होते.
पण एक गोष्ट मनाशी पक्की होती — स्वामींनी मला इथपर्यंत आणले आहे, तर पुढचा मार्गही तेच दाखवतील.
मनात थोडी हुरहूर होती, डोळ्यांत नकळत पाणी तरळत होते; पण स्वामींवरील श्रद्धा मात्र कायम होती. मी मनोमन त्यांचे स्मरण करत राहिलो.
साधारण पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मला सांगलीहून पुढे जाण्यासाठी एक वाहन मिळाले. त्या वाहनाने मी जयसिंगपूरपर्यंत पोहोचलो. इथपर्यंतचा प्रवास झाला होता; पण कुरुंदवाडला पोहोचण्यासाठी अजूनही मार्ग शोधायचा होता.
पहाटे साधारण ३:३० ते ३:४५ च्या दरम्यान एक दुचाकीस्वार तिथे आला. तो नरसोबावाडीच्या दिशेने जात असल्याचे समजले. त्याला पाहून मी सहज विचारले,
“दादा, मला KPT पर्यंत सोडाल का?” (म्हणजे पहाटे ड्युटी संपून जाणारे कारखान्यातील कामगार मला कुरुंदवाड पर्यंत सोडतील या आशेने मी विचारलं ).
त्या व्यक्तीने विचारले तुम्ही कुठे जाणार आहात?
मी म्हणालो कुरुंदवाड .
काही क्षण तो थांबला. त्यानंतर तो म्हणाला, “मी नरसोबावाडीला चाललोय.”
त्याचे हे उत्तर ऐकल्यावर मी मनातल्या मनात पुन्हा एकदा “श्री स्वामी समर्थ!”
वाडी-औरवाड सर्कल ठिकाणी आम्ही चहा घेतला... त्यांना धन्यवाद सांगून मी पुढे चालू लागलो.
मला माहीत होते की, आता कदाचित पुढचा प्रवास पायी करावा लागेल. पहाटेचे साधारण ४:१५ वाजले होते. त्यानंतर हेडफोन लावून गाणी ऐकत मी कुरुंदवाडच्या दिशेने चालत जाण्याचा विचार केला. अंतर साधारण चार ते साडेचार किलोमीटर होते.
मी चालत जाण्याची तयारी करत असतानाच त्या व्यक्तीने कोणालातरी फोन केला. फोनवरील व्यक्तीही पुढील प्रवासासाठी निघण्याच्या तयारीत होती, परंतु त्याला अजून दहा ते पंधरा मिनिटे लागणार होते असे ऐकू आले कारण मोबाईल स्पीकरवर होता काही वेळाने त्या दुचाकीस्वाराने माझ्याकडे येऊन मला म्हणाले....
“बसा गाडीवर, मी तुम्हाला कुरुंदवाडपर्यंत सोडतो.”
त्याचे हे शब्द ऐकताच मनाला एक वेगळीच शांतता मिळाली. काही वेळापूर्वी ज्या प्रवासासाठी वाहन मिळेल की नाही, याची चिंता होती, तोच प्रवास आता सहज पूर्ण होणार होता.
त्या क्षणी माझ्या मनात एकच विचार आला — स्वामी, तुम्ही माझी प्रार्थना ऐकलीत!
पहाटे साधारण ४:३० वाजता मी कुरुंदवाडच्या शिवतीर्थवर सुखरूप पोहोचलो. त्या प्रवासात स्वामींच्या कृपेची आणि त्यांच्या सोबत असल्याच्या भावनेची मला सतत जाणीव होत होती.
त्या पहाटेच्या प्रवासाने मला पुन्हा एकदा शिकवले की, आयुष्यात प्रत्येक गोष्टीचे उत्तर आपल्याला लगेच मिळेलच असे नाही. कधी कधी परिस्थिती कठीण होते, पुढचा मार्ग दिसत नाही आणि मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. पण अशा वेळी श्रद्धा टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते.
माझ्या या अनुभवातून मला जे जाणवले, ते शब्दांत सांगणे कठीण आहे. मदत करणारी व्यक्ती कोण असेल, ती कधी भेटेल आणि कोणत्या रूपात आपल्या आयुष्यात येईल, हे आपल्याला माहीत नसते. पण कधी कधी अगदी अनपेक्षित वेळी एखादी व्यक्ती मदतीसाठी पुढे येते आणि आपला अडलेला मार्ग सुकर होतो.
त्या दिवशी मला मदतीला आलेला माणूस हा माझ्यासाठी स्वामींच्या कृपेचा अनुभव ठरला.
हा माझ्यासोबत घडलेला सत्य अनुभव आहे. या प्रसंगाने माझी स्वामींवरील श्रद्धा आणखी दृढ केली. आजही त्या पहाटेच्या प्रवासाची आठवण झाली की मन भरून येते आणि स्वामींच्या चरणी आपोआप हात जोडले जातात.
आपण श्रद्धेने हाक मारली, की मदत नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणेच मिळेल असे नाही; पण कधी कधी अनपेक्षित व्यक्तीच्या माध्यमातूनही आपल्याला आधार मिळतो. माझ्यासाठी तो आधार म्हणजे श्री स्वामी समर्थांची कृपा.
स्वामी, त्या दिवशी तुम्ही माझ्यासोबत होतात, हीच माझी भावना आणि हीच माझी श्रद्धा!
🙏 श्री स्वामी समर्थ!
एक स्वामी भक्त अभिजीत
7620353656