Vrushali Athale

Vrushali Athale *Counseling Psychologist*Psychotherapist
*Marriage Counselor*Relationship counselor
*Career Counselor*Writer

21/07/2026

Thrilled to announce that I have successfully qualified Therapeutic Yoga Consultant, YCB topmost Level 7 certified by the Yoga Certification Board under the Ministry of AYUSH, Government of India! It is Nationally and Internationally recognised.
This rigorous journey has equipped me with advanced, government-recognized expertise in designing highly personalized, therapeutic yoga programs to manage health conditions and promote holistic wellness.
*Vrushali Athale*

Therapeutic Yoga consultant YCB Level 7 हा आयुष मंत्रालयाद्वारे प्रमाणित योग क्षेत्रातील सर्वोच्च आणि अंतिम स्तर मी यशस्वीपणे पूर्ण केला.
उपचारात्मक योग सल्लागार होण्यासाठी आपण YCB प्रमाणित Yoga Therapist असणं आणि योगशास्त्र विषयात उच्च पदवी / Post-graduation पूर्ण असणं ही पात्रता होती. त्यामुळे अर्थातच ते सगळं आधीच पूर्ण केलं होतं. ह्या संपूर्ण प्रवासाने मला काय दिलं हे मी ह्या एका छोट्या लेखात नाहीच व्यक्त करू शकणार.
चला yoga शिकूया इथून सहज सुरू झालेला प्रवास अतीशय शास्त्रोक्त पद्धतीने योगाभ्यास शिकत आणि करत करत "योगोपचारक" (Yoga Therapist) आणि "उपचारात्मक योग सल्लागार" ( Therapeutic Yoga consultant) झाले आणि हा प्रवास पूर्ण झाला.
एखादी गोष्ट किंवा एखादा विषय शिकायचा म्हटलं की त्याच्या पार मुळापर्यंत जात नाही तो वर मी स्वस्थ बसू शकत नाही. अवती भवती चाललेले अनेक योगाचे क्लासेस पाहिले की, social media वरती yoga शिकवणारे पाहिले की आपल्या प्रश्नांना उत्तरं मिळण्या ऐवजी नवीन च प्रश्न पडायचे. अर्थातच शास्त्रोक्त पद्धतीने योग शिकवणारे योग शिक्षक आणि योगोपचारक हे सगळे अपवाद वगळता खूप सदोष योग शिकणारी आणि शिकणारी माणसं बघून मनाचा गोंधळ आणि शंका वाढलेल्या. परिणामी खूप मोठा काळ माझं योग शिकणं करणं सगळं बंद झालं. पण त्यामुळे मी बेचैन होते. योगशास्त्र ह्या विषयाची ओढ मला काही स्वस्थ बसू देईना आणि मग अचानक मनांत आलं आणि सुरुवात केली.
योग म्हणजे निव्वळ योगासनं नसून जे जे काही आहे ते ते सगळं शिकले. पातंजल योगसूत्र, योगवशिष्ठ, हठप्रदीपिका, घेरंड संहिता, भगवद्गीता अशा ग्रंथांची ओळख झाली आणि योग म्हणजे काय हे उमजायला लागलं . तसंच भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख झाली, ईश्वरवाद आणि अनिश्वरवाद उलगडायला लागला. योग ह्या विषयाचं मला वेड लागायला लागलं. अनेक तज्ञ गुरुजनांकडून इतकं भरभरून ज्ञान घेता घेता जाणवलं की हा मिळालेला माणसाचा जन्म फार छोटा आहे आणि शिकावं आणि आत्मसात करावं असं खूप काही ह्या ब्रम्हांडात व्यापून राहिलेलं आहे.
योगोपचार म्हणजे उपचाराकरिता केलेल्या यौगिक प्रक्रिया! योगोपचाराचा अभ्यास हा मानवी शरीर शास्त्राच्या अभ्यासाशिवाय (Human Anatomy and Physiology) होऊच शकत नाही. मग अभ्यास एक एक पायरी चढत गेला. योग प्रवेश, योग परिचय , योग शिक्षक, योगशास्त्र ह्या विषयात Masters सगळं झालं. तरीही आधुरेपण जाणवत होतं. आपण globally recognised Yog teacher झालो ह्याचा कमालीचा आनंद झाला ही. पण तो आनंद २ दिवस जेमतेम टिकला. कारण clinic सांभाळून योग शिकवणं मला शक्य ही नव्हतं आणि मुळात मला ते करायचं ही नव्हतं. त्याचं कारण इतक्या जास्त प्रमाणात शारीरिक आणि मानसिक व्याधी वाढलेल्या आहेत की योग शिकवणाऱ्यांना आणि योग शिकणाऱ्यांना आपण जे करतोय ते आपल्या प्रकृती साठी योग्य आहे की नाही ह्याची खरच कल्पना नसते. परिणामी योग्य तो परिणाम साध्य होत नाही. म्हणून पुढे अभ्यास करावासा वाटला. आणि योगाभ्यास, म्हणजेच यौगिक प्रक्रिया अनेक व्याधींच्या मुक्ततेकरिता उपयोगी पडतात हे सत्य वैज्ञानिक दृष्टिकोनातून आता जगभर मांडलं गेलं आहेच. अनेक शारीरिक आजार, मानसिक आजार, आणि मनोकायिक आजार दिवसेंदिवस वाढत आहेत अशा परिस्थिती मध्ये योगोपचाराचा महत्वाचा उपयोग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून करणे आणि योगोपचाराला जीवनपद्धती म्हणून स्विकारणे अत्यंत लाभदायक असू शकते ह्यात आता शंका उरली नाही. माझा ह्या विषयातला अभ्यास पूर्ण झाला असं म्हणायचं धाडसच होणार नाही इतकं अजून बाकी आहे. ही खरी सुरवात झाली असच म्हणावं लागेल.
© वृषाली आठले
२१/७/२०२६






मौनाची परिभाषा © वृषाली आठले २९/५/२६गेल्या काही काळात मन नकळत मौनात राहायला लागलं आहे. ह्याला काही कारण नाही असं तर नाही...
29/05/2026

मौनाची परिभाषा
© वृषाली आठले
२९/५/२६
गेल्या काही काळात मन नकळत मौनात राहायला लागलं आहे. ह्याला काही कारण नाही असं तर नाही म्हणता येणार..अनेक कारणं आहेत! हा अनुभव कदाचित आपल्यातल्या प्रत्येकाला आला असेलच. तर अशा ह्या अनेक कारणांची आता कुणाशीही चर्चा करावीशी वाटत नाही अशी एक अवस्था येते, आणि मग आपण एकटे एकटे तरी राहायला लागतो किंवा सगळ्यांमध्ये असतानाही आपल्याला एकटेपण येतं. हे एकटेपण असतं की तो आपण स्वतः निवडलेला एकांत असतो हे आपलं आपल्याला उमगलेलं असतं. इथे सुरुवात होते गप्प रहाण्याची. एकटेपण जाणवत असेल तर त्या जोडीला औदासिन्य नैराश्य येतं. आणि जर तुम्ही निवडलेला एकांत असेल तर नकळत मौन घडतं.
मौनाने नेमकं काय साध्य होतं हे मौन पाळल्या शिवाय कळत नाही. मी ३ दिवस ३ रात्र म्हणजे ७२ तास मौन पाळलं आहे.. ते ही एक वर्षाच्या अंतराने परत ..असं दोनदा! म्हणजे ६ दिवस मौन अनुभवलं आहे. दिवसा ठराविक वेळात योगाभ्यास, प्राणायाम, सुदर्शन क्रिया, ध्यानधारणा, ओंकार साधना आणि योग निद्रा. बाकी पूर्ण मौन..७२ तास फोन बघितला नाही, टीव्ही नाही, घरात कुणाशी खाणा खुणा नाहीत ,अगदी नजरानजर सुद्धा नाही. फक्त स्वयंपाक करून ठेवायचा आणि स्वतःच्या खोलीत बंद..२ वेळा जेवण २ वेळा चहा . बाकी फक्त यौगिक क्रिया.असा अनुभव ठरवून घेतला.
अगदीच 'मौनम् सर्वार्थ साधनं'.. असं होत नाही. मात्र आपल्याच अनेक प्रश्नांची उत्तरं आपली आपल्यालाच मौनात मिळतात हे नक्की. स्वतःच्या शरीर मनांत झिरपत जाणारी शांतता अनुभवणं फार सुंदर असतं! सुरवातीला ही शांतता बोचते, अनेक गोष्टी आठवून रडू येतं, अस्वस्थ वाटतं. आणि मग मौनात असल्यामुळे ते रडणं पूर्ण होतं आणि हलकं हलकं वाटतं. मग जाणीव होते की Catharsis म्हणतात ते हेच.. भावनांचा पूर्ण निचरा होतो आणि मग मन हलकं होतं. विचारांना अलगद छान दिशा मिळते. आपल्या विचारांची स्पष्टता वाढते.
"जा मी आता तुझ्याशी इथून पुढे बोलणारच नाही..." असं लहानपणी मैत्रीत आपण कुणाला तरी, कधीतरी नक्की म्हटलं असेल..कधी भावंडांमध्ये काही भांडणं झाली की आपण उघडपणे असं बोललो असू किंवा मनांत तरी तसं ठरवलं असेल..पुढे नवरा बायको मधे तर खूपच वेळा 'आता ह्याच्याशी किंवा हिच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही' असं असंख्य वेळा वाटलं असेल. बायकांच्या तुलनेत पुरुष तसे ही कमीच बोलतात. किंवा उलट ही म्हणता येईल की पुरुषांच्या तुलनेत बायका अती जास्त बोलतात. असो. थोडक्यात बऱ्याच वेळा अबोला ही राग आल्यानंतर ची किंवा दुखावलं गेल्यानंतरची एक महत्वाची प्रतिक्रिया असते! आपल्याला अगदी कुणाचाही आणि कशाचाही राग नाहीच आला तरी आपण दुखावलं जाणं मात्र नक्कीच खूप वेळा अनुभवतो. मग तेव्हा सुद्धा बोलू च नये असं वाटतं. ते योग्य ही असतं. म्हणजे मुळात आपलं बोलणं व्यर्थ आहे ही जाणीव झाली की त्या क्षणी आपण अबोल होतो किंवा अंतर्मुख होतो.
अबोल होणं हे बाह्य आहे, वरकरणी आहे..पण अंतर्मुख होणं ही मात्र अंतर्गत गोष्ट आहे. थोडक्यात बाहेरून अबोल वाटणारी व्यक्ती खऱ्या अर्थाने अंतर्मुख झाली असेल असं नाही. अबोल असणारा माणूस दुसऱ्याशी संवाद साधत नसतो, तर अंतर्मुख झालेला माणूस आत्मसंवाद साधू लागतो. आणि वैचारिक प्रगल्भता असेल तर असा आत्मसंवाद आध्यात्मिक प्रगती करणारा होतो. क्वचित कधीतरी आपल्याच विचारांची खोली आणि उंची , लांबी रुंदी सगळं सगळं फिरून झालं की विचारांचा फोलपण जाणवतं. पण तरीही बाहेरील गोंगाट थांबतो. मौन म्हणजे कमकुवतपणा नसून मनाची ताकद आहे हे जाणवायला लागतं . आत्मसंवाद होता होता विचारांना शांत करण्याची उच्चकोटीची अवस्था यायला लागते तेव्हा मौन साध्य होतं!
मात्र मन भूतकाळातल्या आणि भविष्यातल्या कल्पनांमधून मुक्त होईल इतका संयम, इतकं मौन साधणं ही फार दूर ची अवस्था आहे..एक सामान्य माणूस म्हणून ह्या कल्पनेची सुद्धा भीती वाटते.. असं वाटतं की मानसिक आणि आंतरिक शांतता मिळवता आली की सगळं काही साधलं. ह्यापुढे प्रगती मात्र नको. आपल्यातले आपण असे अतीसामान्य आहोत, हे असं असणं किती छान आहे!
द्वंद्व सामान्य असतील तर मानसिक दृष्टीने संतुलित झाल्यावर त्याचा त्रास होणार नाही. पण हे ही विसरून चालणार नाही की अशी अनेक द्वंद हेच आपलं माणूसपण!
ततो द्वन्द्वानभिघातः अशी अवस्था येण्यासाठी प्रगती मात्र हवी!
© वृषाली आठले
Counseling Psychologist
Psychotherapist






#मनस्वास्थ्य

कोकण- संघर्षातलं सौंदर्य © वृषाली आठले         चार घरांचे गाव        चिमुकले पैलटेकडीकडे..       शेतमळ्यांची दाट लागली  ...
01/03/2026

कोकण- संघर्षातलं सौंदर्य
© वृषाली आठले
चार घरांचे गाव
चिमुकले पैलटेकडीकडे..
शेतमळ्यांची दाट लागली
हिरवी गर्दी पुढे!
बालकवींच्या कवितेत दिसतं आमचं गाव. गाडी गावाजवळ जायला लागली रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारी प्रत्येक खूण खुणावते असं वाटतं. ह्या वेळी वाटेतल्या प्रत्येक आंब्याला मोहर होता, प्रत्येक काजू वर मोहर होता. करवंदावर छान फुलं होती. मनात आलं की इतकं छान मोहरुन यावं ते ह्या झाडांनीच..माणसांना असं जुनं विसरून नव्याने नाही मोहोरता येत. गाडीच्या खिडकीच्या काचा खाली करून त्या मोहोराचा गंध श्वासात भरून घेत होते मी. प्रत्येक वळण ओळखीचं.. प्रत्येक झाड ओळखीचं..लाल मातीने माखलेले रस्ते पायवाटा जणू दर वेळी विचारतात की 'अगं किती दिवसांनी आलीस बये!' माझी आजी मला बाया म्हणायची. हा खास कोकणातला शब्द, बाया..तिच्या त्या बाया हाक मारण्यात गोडवा होता. प्रत्येक वेळी गावाला जाताना मनात येतं की आत्ता आजी असती तर तिला किती कौतुक वाटलं असतं की नात आई बाबांना घेऊन गावाला येतेय, राहतेय. असं वाटलं आत्ता आई बाबांबरोबर ती असती तर तिला ही घेऊन आले असते. तिचीही सेवा केली असती. पण वय थांबत नाही ना. ना तिचं वय थांबलं, ना आई बाबांचं थांबलं, ना माझं थांबलं. वय, वेळ, काळ, सगळं पुढे सरकत राहतं. आपण मात्र लगबगीने त्याबरोबर धावतो.
ह्यावेळी ठरवून आई बाबांबरोबर गावाला राहिले. कोकणात राहणं सोपं नाही. प्रत्येक बाबतीत संघर्ष असतो. आपण कधी नव्हे ते जाणार मग घराची साफसफाई हा मोठ्ठा उद्योग असतो. मी तर जाताना गाडीतून सगळा संसार घेऊन जाते. संसार म्हणजे अर्थातच स्वैपाकघरात लागणारं सगळं काही हे बायकांच्या लक्षात येईलच. आमचे दिवाकर दादा आणि वासंती मदतीला येतात म्हणून शक्य होतं सगळं. अख्खं घर धुवून पुसून काढून, सामान भरून मग सुरवात होते. घर लाऊन अंघोळ करून देवापाशी आणि तुळशी पाशी दिवा लावला की खरी तिथल्या संसाराला सुरुवात होते. प्रसन्न वाटतं!
हल्ली खूप लोकं कोकणात पर्यटनाला येतात. आणि खूप कौतुक करतात इथल्या निसर्गाचं. आपण कोकणचे आहोत ह्याचा कमालीचा अभिमान आहे मला. पण ह्या फिरायला चार दिवस येणाऱ्या लोकांना सांगावसं वाटतं की कोकणात राहणं आणि कोकणात फिरायला जाणं ह्यात खूप फरक आहे. इथे राहणं आव्हानात्मक आहे असं मला लहानपणापासून वाटत आलं आहे. डोंगराळ भाग, नद्यांचे प्रवाह, कुठे समुद्र ,खाडी किनारपट्टी हे सगळं खूप सुंदर आहे..पण अजूनही गावागावात चांगले रस्ते नाहीत. एक बस चुकली की पुढे कितीतरी वेळ दुसरं वाहन मिळत नाही. किराणामाल लांबून आणावा लागतो. जवळपास दुकानं नाहीत. शाळा कॉलेज वैद्यकीय सुविधा सगळ्यासाठी अजून ही खूप दूर जावं लागतं. पावसाळ्यात अतिवृष्टी मुळे लोकांचा एकमेकांशी संपर्क तुटतो. प्रत्येक गावात अजून फोन लागत नाहीत. ह्या आणि अशा अनेक अडचणी आपल्याला जाणवतात. मात्र इथली स्थानिक माणसं ह्या अडचणींना आपलसं करून सहज जगतात. भयंकर कौतुक वाटतं मला ह्याचं!
ह्या वेळची माझी ट्रिप वेगळी ठरली ह्याची काही खास कारणं आहेत. ह्यावेळी ह्यातल्या एक एक अडचणीने माझा आणि मी अडचणींचा पिच्छा पुरवला! गावांत २ घरांमध्ये wifi बसवल्याचं समजलं होतं. माझ्या काकानी पण बसवलं..मग लगेच काकाशी बोलून त्या माणसाला बोलवून आधी घरी wifi घेतलं. तो दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा की काय असं वाटलं. ज्या गावात फोन करण्यासाठी अख्खा डोंगर चढून जावं लागायचं त्या गावात आमच्या प्रत्येक घरात चक्क फोन, whatsapp कॉल , वगैरे शक्य झालं होतं. ह्या आनंदात चार दिवस गेले आणि चार दिवसांनी wifi बंद झालं म्हणून त्या माणसाला बोलावून बघायला सांगितलं तर बघितल्यावर थंडपणे त्यानी सांगितलं " वानराने उडी मारून ती cable तोडून टाकली आहे"..मग काय फ्रिज बिघडला, टीव्ही बिघडला मग दुसऱ्या गावातून माणसांना बोलाऊन त्याची दुरुस्ती. सगळं झाल्यावर लक्षात आलं की ह्या सोयी सुविधांशिवाय आपण जगू शकत नाही हेच खरं. एरवी आम्ही जरी फोन नेटवर्क नसलेली ठिकाणं जगात शोधून शांतपणासाठी जात असलो तरी इथे आई वडिलांच्या काळजी पोटी , त्यांच्याशी सहज संपर्क व्हावा म्हणून हे सगळं अत्यावश्यक आहे हे जाणवतं. थोडक्यात आता ज्या गावांत इलेक्ट्रिसिटी नाही, फोन नाही, डॉक्टर नाही अशा गावांत आपली आजी कशी राहिली असेल ही कल्पना सुद्धा करवत नाही. मग जाणवतं की ज्या गोष्टींना आपण सोयी सुविधा म्हणतो त्या अत्यावश्यक आहेतच. तिथल्या कष्टकरी लोकांची जिद्द आणि त्यांचे कष्ट ह्याची आपण कल्पनाच करावी आणि तोंडभरून त्यांचं कौतुक करावं असं मला नेहेमी वाटतं. आपण शहरात राहणाऱ्या लोकांनी ह्यांच्याकडून चिकाटी आणि मेहेनत शिकावी..निदान त्यांचे कष्ट समजून घ्यावे. आणि अगदीच ह्यातलं काही जमलं नाही तर निदान त्यांना अक्कल शिकवायला मुळीच जाऊ नये!
ह्यावेळी गावाच्या वरती डोंगरावर, म्हणजे मुख्य रस्त्याला लागून जे आरोग्यकेंद्र आहे तिथे मी जाऊन आले. तिथे on duty असलेले डॉक्टर सिस्टर आणि आशा स्वयंसेविका ह्या तिघांनाही भेटून त्यांच्याशी बोलून मला खूप बरं वाटलं. ते डॉक्टर प्रत्यक्षात डॉक्टर नसून Bsc nursing केलेले आहेत हे त्यांचीच मला सांगितलं. सरकार नी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी मला सांगितल्या. जवळपास ची चार गावं ते आठवड्यातून बघतात. एक जालन्याचा तरुण इथे कोकणात येऊन नोकरी करतो. ती सिस्टर/ नर्स तिथे स्वतःच्या शाळेत जाणाऱ्या मुलाला घेऊन २४ तास त्या आरोग्यकेंद्रात वस्तीला असते. सूर्य मावळल्या नंतर जिथे कभिन्न काळोख असतो, हाक मारण्याच्या अंतरावर घर नाही, कुणाची सोबत नाही, स्वतःला काही मदत लागली तर मदतीला माणूस नाही अशा ठिकाणी वेगळ्याच गावातून नोकरीसाठी येऊन राहणं सोपं नाही. मला फार कौतुक वाटलं तिचं. गावातली लोकं छोट्यामोठ्या आजारपणात तिथे जातात, त्यांना तपासणं, औषधं देणं , Bp, sugar तपासून काही bloodtest वगैर करणं आणि काही प्राथमिक उपचार ही टीम छान करते हे बघून बरं वाटलं. वैद्यकीय सोयी सुविधा असल्या म्हणजे आपल्याला सुरक्षित वाटतं ही आपली शहरी लोकांची मानसिकता आहे. आपल्याला कधीतरी काहीतरी आजारपण आलं, emergency असली तर उत्तम हॉस्पिटल, तज्ञ डॉक्टर, ॲम्ब्युलन्स सगळी व्यवस्था हवी असं वाटतं आपल्याला. पण त्यामुळे रोजच्या जगण्यात आपण नैसर्गिक गोष्टींपासून किती दूर गेलो आहोत ह्याचा साक्षात्कार गावाला जाऊन राहिलं की मगच होतो. तिथल्या खडतर जगण्यातच तिथल्या लोकांच्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे हे नक्की. सकाळी उजाडल्या पासून अंगमोडून च काम करतात ही लोकं.. एकदा मागचं पुढचं अंगण झाडलं तरी पाठीचा कणा मोडणं म्हणजे नेमकं काय हे कळतं आपल्याला. आणि अशावेळी तीव्रपणे जाणवतं की इथल्या कष्टप्रद जगण्यातच त्यांचं आरोग्य आहे बहुदा. सगळी साफसफाई करताना वरच्या मजल्यावर बेडरूम मधे मला एकदा मण्यार दिसली, घाई ने दरवाजा बाहेरून बंद करून मी दिवाकर दादांना बोलावलं त्यांनी पटकन ती मण्यार मारली बाहेर लांब नेऊन टाकली आणि पुन्हा कामाला लागले, इतक्या सहज तर मला डास सुद्धा मारता येत नाही. पाचसहा दिवसांनी पुन्हा वरच्या मजल्यावरच्या बेसिन वर छान वेटोळं घालून बसलेली दुसरी मण्यार माझ्या भावजयीला दिसली..पुन्हा दादा आले आमच्या संरक्षणासाठी. त्यांना म्हटलं " दादा तुम्हाला काय मंत्र येतात ते म्हणा हो, दोनदा दिसलं जनावर"...(आमच्या कोकणात सरपटणाऱ्या प्राण्यांना किंवा विषारी सापांना जनावर म्हणतात.) दादांनी शांतपणे सांगितलं " नाय ता मण्यार काय ऐकित नाय ह्या मंत्राला...तिच्यात विष नाय". कोकणात जन्मलेल्या आणि एवढी वर्ष फक्त तिथेच राहिलेल्या दादांना ह्या सरपटणाऱ्या जीवांचा दांडगा अनुभव होता. पण माझ्यासाठी मात्र तिथे झोपणं हा संघर्ष होता.
रोजचं जगणं अत्यंत कठीण असूनही कोकणी माणसं तशी साधी आणि सरळ आहेत. बोलताना खोचक बोलतील पण ती त्यांची भाषा झाली..शहरातून येऊन कुणी अक्कल शिकवली तर असं होणारच ना! मग त्यांचा खोचकपणा, चमत्कारिकपणा अनुभवायची तयारीच ठेवायची आपण. हा पण आपण जर त्यांना समजून घेऊन, त्यांच्यातलं होऊन, त्यांच्याच भाषेत त्यांच्याशी संवाद साधला तर मात्र ही माणसं जीव लावतात. इथला पाहुणचार म्हणजे कुठलाही बडेजाव नाही, जे त्या दिवशी स्वतः जेवतील तेच तुम्हाला वाढतील अशी इथली माणसं. पण आपुलकीत मात्र कधीही कमतरता नाही. अशी निसर्गाची आव्हानं पेलत रोजच्या संघर्षाने काटक झालेली इथली माणसं. कोकणातला निसर्ग, हिरवळ, लाल माती , विहीरीचं गार पाणी, गार वारा ह्या माणसांना मायेने बांधून ठेवतो! पण ह्या निसर्ग सौंदर्या इतकंच ह्या काटक माणसांचं ही कौतुक व्हायला हवं.
© वृषाली आठले
Counseling Psychologist Psychotherapist.




त्या फुलांच्या गंधकोशी©वृषाली आठले 13/1/2026त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का..'  हे डॉ सूर्यकांत खांडेकर यांनी लिह...
13/01/2026

त्या फुलांच्या गंधकोशी
©वृषाली आठले
13/1/2026
त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का..' हे डॉ सूर्यकांत खांडेकर यांनी लिहिलेलं आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं माझं अतीशय आवडतं गाणं आहे. लेखकाने परमेश्वराचं अज्ञात अस्तित्व निसर्गाच्या अनेक रूपांत शोधलं आहे! आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी इतकं आर्ततेने ते गायलं आहे की परमेश्वराचं अस्तित्व निसर्गात दिसू लागतं. हे गाणं म्हणजे मराठी साहित्य आणि संगीतातली एक उत्कृष्ट आणि अविस्मरणीय कलाकृती आहे!
निसर्गातली लाल, गुलाबी, जांभळी, पिवळी, पांढरी अशी ना ना रंगांची फुलं पाहिली की ते रंग डोळ्यात आणि मनात साठवून ठेवण्याची धडपड सुरू होते. आधी फुलांची नावं जाणून घ्यायची आवड होती मला, पण आता ती अचानक गेली. आता सुंदर फुलं बघताना कुणी त्यांच्या नावांची चर्चा करायला लागलं की वाटतं नका ना त्या नावांत अडकू..रूप पाहा त्या फुलांचं, गंध श्वासात भरून घ्या! आणि मनात जपून ठेवा! नाव आलं की सगळी माहिती आली, पण रंग आणि गंध आला की अनुभव आला. माहिती पेक्षा अनुभव अधिक खोल वाटतो मला! आणि अनुभवा पेक्षा ही स्वानुभव त्याहून प्रगल्भ! कधी अगदी गडद, कधी भडक, कधी फिकट रंगांची ही उधळण पाहिली की ह्या रंगीबेरंगी फुलांवरून नजर हटत नाही आणि आपण वेड्या सारखे फोटो काढत सुटतो. एकाच ठिकाणचे, एकेका रंगांच्या फुलांचे आपण इतके फोटो काढतो की जणू काही प्रत्येक क्लिक मध्ये, फोटो मध्ये ते रंग वेगळे दिसणार आहेत. आणि मग भान येतं की ही धडपड आहे ते पाहिलेलं रंगीत दृश्य पकडून ठेवण्याची. आपण सहसा पुन्हा त्या जागी येणार नसतो. म्हणून पुन्हा पुन्हा फोटोज् काढून आपण आपल्याच मनाला दिलासा देत असतो बहुदा.. हा पाहिलेलं सुंदर देखावा न विसरण्याचा!
मी खूप प्रवास केला, अनेक ठिकाणी तऱ्हे तऱ्हेची फुलं पाहिली.. काश्मीर मध्ये अक्षरशः प्रत्येक घराच्या कुंपणावर, हॉटेल च्या गेट वर, डवरलेले लाल गुलाबी गुलाब पाहिले, एप्रिल महिन्यात तिथे गुलाबी, अबोली, पिवळ्या रंगांची ट्युलिप (tulip) ची फुलं पाहिली, काश्मीर मधेच केशराचे मळे बघितले तेव्हा जांभळ्या रंगाची केशराची फुलं आणि त्यातला तो केशरी रंगांचा पराग/ केशर पाहताना नजर हटत नव्हती. नैनिताल ला जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या सरसू च्या शेतात फुललेली पिवळी जर्द फुलं पाहण्यासाठी गाडी बाजूला उभी करून त्या शेतात गेलो, ऋषिकेश ला अनेक रंगांची फुलं बघितली, ऊटी ला botanical garden मधली फुलं, डलहौसी मध्ये असताना अनेक ठिकाणी पिवळा पराग असलेली पांढरी फुलं दिसली. कोकणात ला घराच्या परिसरातला चाफा, पारिजात ,करवंदाची फुलं, कवठी चाफा, कुंदाची फुलं, जास्वंद, गावठी गुलाब, कण्हेर, सोनटक्का, मोगरा अशी एक ना अनेक फुलं जवळून पाहिली, अनुभवली. पेलिंग मधून दार्जिलिंग ला जाताना पाहिलेलं झेंडूची फुलं आणि मागे हिमशिखरं हे दृश्य कधीही मनातून जाणार नाही. तसंच कुठल्याही देशांत, प्रांतात दिसणारी बोगनवेल आणि तिचा तो गडद रंग..कितीही वेळा पाहिला तरी आपण आपला कॅमेरा काढून लगेच क्लिक करतोच. ह्या वेळी थायलंड मध्ये khao yai flower park मध्ये अशीच अनेक रंगीबेरंगी फुलं पाहिली. नजरेत हे रंग ताजे ताजे असतानाच मन आधीच्या स्मृतींमध्ये कधी गेलं समजलंच नाही. तिथले रंग नजरेने टिपताना मन आधी टिपलेल्या फुलांत गेलं..त्यावेळी मनामध्ये ही ह्या सुंदर फुलांसारखाच आठवणींचा ही बहर होता ही खूप सुखद जाणीव झाली! फुलांचं आयुष्य फार कमी असतं पण त्यांचं ताजेपण, रंग, रूप, गंध सगळच आपल्या कायम स्मरणात रहाणारं असतं. जातायेता सहज बघितलं तरी मनांत शिरणारी, फोटो काढले तर त्याच त्याच फोटोंवर नजर ठरून राहील अशी, अलगद उचलून हातात घेतल्यावर आपल्या हातांना सुगंध देऊन जाणारी, देवघरातल्या देवांवर वाहिल्यावर निरंजनातल्या ज्योतीच्या प्रकाशात..आपण देवाच्या पायी आल्याच्या सुखांत अधिकच उजळून दिसणारी फुलं हा देवत्वाचा एक देखणा चमत्कार वाटतो मला!
©वृषाली आठले
Counseling Psychologist and Psychotherapist





28/09/2025

*मैत्री च्या तऱ्हा*
© वृषाली आठले
प्रत्येकाच्या मैत्रीत एखादा नाका, एखादा कट्टा, किंवा एखादा अड्डा असतोच. एका विशिष्ट वयात तो जितका खास असतो तितका तो नंतर राहतोच असं नाही. ह्याची कारणं अनेक असतात. सामान्य कारणं अशी की लहानपणीचे मित्र किंवा तरुणपणातले मित्र आपापल्या उद्योग, व्यवसाय, करिअर मध्ये स्वतःला सिद्ध करत असतात, मग प्रत्येकाचा "तो" किंवा "ती" आयुष्यात येते, आपापल्या संसारात ते रमतात. जबाबदाऱ्या वाढतात, अनेक अडचणींना तोंड देत असतात. वगैरे वगैरे.. पण हे सगळं अगदी स्वाभाविक आहे. तरीही ह्या नाक्याची मैत्री घट्ट रहाते. अगदी सगळा नाका किंवा कट्टा अशा घट्ट मैत्रीत बांधला जातो असं नाही. पण तरीही एकमेकाला भेटून फ्रेश वाटण्या इतपत ही मैत्री नक्की असते. जिथे भेटलो की तेच तेच विषय, तेच तेच विनोद असूनही मन हलकं होतं, पुन्हा लवकर भेटू असं ठरवलं जातं. जे प्रत्यक्षात मात्र कधीही होत नाही. पूर्वी वाटायचं की ह्याची कारणं अगदी प्रॅक्टिकल म्हणता येतील अशीच असणार. पण कालांतराने जशी भेटण्या मध्ये खूप gap पडायला लागली तसं जाणवलं की आपण समजत होतो तसं नाहीये. कदाचीत वारंवार भेटावं अशी फार शी ईच्छा नसावी ,किंवा ईच्छा असली तरी लोक म्हणतात तसं त्यांना भेटायला जमत नसावं, किंवा सहज भेट झालीच तर ठीक पण भेट नाहीच झाली तरी फार काही फरक पडत नसावा..आता ह्यातलं नेमकं काय हे ज्याचा तोच जाणे.
बऱ्याच काळाने गणपती निमित्त भेट झाली तेव्हा एका मित्राजवळ न आलेल्या दुसऱ्या मित्राची चौकशी करता फार मजेशीर उत्तर मिळालं...ते असं...की "अगं तो मजेत आहे, तुझ्या आयुष्यात त्याचा जेवढा सहवास होता तेवढा पूर्ण झाला असं समजायचं" भेटलेल्या मित्राने इतक्या सहजपणे हे म्हटलं की मी उडालेच.. हे विधान माझ्यासाठी मजेशीर वगैरे न राहता फार गंभीर तत्त्वज्ञान असल्यासारखं आरपार शिरलं माझ्या मनांत. आणि मग जाणवलं मानसशास्त्र आणि तत्वज्ञान कोळून प्यायलेली बाई आहे मी, पण मी इतक्या सहज हे सत्य पचवू शकत नाही. कारण मी अती जास्त सकारात्मक आहे. वास्तवातल्या गोष्टींकडे सतत सकारात्मक विचारांनी पहात असते मी. आणि ते तसंच असावं ह्यासाठी धडपडते. पण अलीकडे लक्षात आलं आहे की ही धडपड एकतर्फी आहे. मग आपोआप withdrawal घडतं. मनातून नाही, पण कृती नी अलिप्तता येते.
आमच्या मित्रांचे किस्से काही कमी नाहीयेत. आमच्या नाक्याची एक खास (पण माझ्या शब्दशः डोक्यात जाणारी) खासियत म्हणजे ग्रूप मधे अत्यंत आलतुफलतू पोस्ट वर react होतील, पण आपण जर वैयक्तिक नावं घेऊन (@) msg लिहिला तर वाचल्या नंतर सुद्धा अजिबात वाचलंच नाही असं दुर्लक्ष करतील. कोण वागतं असं??? असा प्रश्न मला गेली अनेक वर्ष भेडसावयचा....पण अलीकडे मी ते पचवलं आहे की हे फक्त आणि फक्त आपल्याच "जवळच्या" मैत्रीत घडतं. मला खरंच प्रश्न पडतो की जर काहीही संवाद च नसेल तर ही मैत्री जवळची असं आपण का म्हणतो? क्वचित कधीतरी भेटल्यानंतर थोडा वेळ चक्कलस केली की मैत्री जवळची होते का?? मग ह्या प्रश्नाचं उत्तर माझं मलाच मिळालं की मी च जास्त अपेक्षा ठेवत होते.. कदाचीत मैत्री ही अशीच असावी अनेकांसाठी. त्यात मी बसत नव्हते. आणि आपण जेव्हा एखाद्या गोष्टीत ठीक ठाक बसत नाही ना, तेव्हा आपल्यामध्येच प्रोब्लेम आहे म्हणावं आणि गप्प बसावं. कारण जेव्हा उरलेल्या समस्त मित्र मैत्रिणी ना हे खटकत नाही तेव्हा उघड असतं की आपण च 'Odd man Out' आहोत. आपण म्हणजे मी.
तसं नाही नाही म्हणत म्हणत आम्ही मित्रांनी काही छोट्या trips आणि मोठे tours एकत्र केले..खरच खूप धमाल केली. पण त्यात पण गंमत म्हणजे एखाद्या मित्राला प्रत्यक्ष ट्रिप ला जाण्यापेक्षा ट्रिप ठरवण्यासाठी meeting म्हणून भेटण्यात आणि चर्चा करण्यात जास्त इंटरेस्ट.. एकाला काय तर ठरत आलेली ट्रिप cancel करण्यातच जास्त इंटरेस्ट.. एखादा ह्यातलं काहीही कधीही आपल्या साठी नाहीच आहे असं समजून वरून ते तुम्हालाच कसं समजत नाही म्हणून हा तुमचाच कसा प्रोब्लेम आहे हे तुम्हालाच जाणवून देणारा...एखादा सगळ्यात सहभागी होईल पण ग्रूप वर मात्र कधीही न बोलणारा.. एखादा काहीही कारण नसताना उगीचच सगळ्यांचं विचित्र वागणं सांभाळून घेणं ही जणू त्याचीच जबाबदारी असल्या सारखं बोलणारा, मात्र स्वतः ही फार seriously कधीही काहीही न वाचणारा.. एखादा त्याला ग्रूप मधे add कराल तितक्या वेळा ग्रुप सोडणारा.. एखादा फक्त जसं काही दुसऱ्यांना good morning करणं एवढीच त्याच्यावर कुणीतरी जबाबदारी टाकल्या सारखा..इतकं की त्याच्या आगे मागे काय लिहिलंय ह्याचा सुतराम संबंध त्याच्याशी नाहीच असं वागणारा..एखादा कुणी कुठलीही पोस्ट करो राजकीय किंवा विनोदी.. सगळ्या पोस्ट ला आवर्जून अंगठा दाखवणारा, लाईक करणारा..एखादा एखाद्याच msg ला "मी अंगठा दाखवला होता" अशा defensive mode वर असणारा...तर असे आमचे मित्र... अर्थात ह्या एखाद्याच्या यादीत एखादा आणि एखादी दोन्ही आले बरं का.
कुणाचाही वाढदिवस असला की आवर्जून आठवणीने msgs असतात ग्रूप वर. जसे सगळे वयाने मोठे झालो तसे वाढदिवसाचं कारण काढून भेटलो, खास करून प्रत्येकाच्या ५० व्या वाढदिवशी नक्की भेटलो. आता एक एक करत आमची सगळ्यांची "साठी..बुद्धी नाठी" होणार हे उघड च आहे. ५० शी साजरी करण्याचा उत्साह ६० मध्ये राहतो की नाही कळेल च. असो...
मैत्री मध्ये boundaries असतातच. किंवा काही बाबतीत त्या असाव्याच. पण त्या कुठल्या बाबतीत असाव्या, आणि किती असाव्या हे मात्र प्रत्येकावर अवलंबून असतं. नेमका तिथे फरक पडतो. मला स्वतःला अभिप्रेत असलेला मोकळेपणा मला समोरून दिसला नाही की मी अस्वस्थ होते. किंवा मैत्रीत खूप जास्त boundaries असतील, आणि त्या स्पष्ट न सांगता वागण्यात दिसत असतील तर मग नेमकी मैत्री आहे म्हणजे काय आहे असे प्रश्न मला पडतात. निदान जे असेल ते खुलेपणाने सांगता येतं आणि जरूर सांगावं अशी जागा म्हणजे माझ्यासाठी मैत्री..अर्थात मी कोण? प्रत्येकासाठी ही गोष्ट वेगळी असूच शकते. पण निदान ते पोचतं करावं अशी सरळ साधी अपेक्षा असते. आणि जेव्हा हे घडत नाही तेव्हा अंतर वाढतं. कुणाला ते कळतं कुणाला कळत नाही. पण अंतर वाढतं नक्की. ह्यावर ह्यातल्याच "एखाद्याचं " म्हणणं असतं की मुळात मैत्रीत इतकं काही seriously घ्यायचंच नसतं. आणि काहीच seriously न घेणं मला फार झेपत नाही. तर अशी ही आमची मैत्री..म्हटली तर निखळ, स्वच्छ, कुठलंही राजकारण न शिरलेली, घरच्यांनाही सामावून घेणारी मैत्री. पण पारदर्शकता आणि भावनिक गरज ह्या महत्वाच्या दोन गोष्टींचा अभाव असलेली. आणि म्हणून आपण एकमेकांच्या जवळ आहोत असं भासवणारी पण अंतर असलेली. हे अंतर काहींना जाणवत असेल ही कदाचित, पण खटकत नसेल. किंवा अनेकांची भावनिक गरज च कमी असेल. ही शक्यता जास्त आहे. आपल्या प्रत्येकाला आपल्या अनेक मित्र मैत्रिणींच्या बाबतीत असे अनेक अनुभव येतात. कुणी त्याची मोकळेपणी वाच्यता करतं, कुणी करत ही नाही. कुणी मैत्रीत मोकळं बोलणं झालंच पाहिजे अशा आग्रही मतांचं असतं तर कुणी बोलणं प्रशस्त नाही अशा विचाराचं असतं. एक मात्र नक्की की मैत्री हे नातं पूर्णतः निस्वार्थी असावं. तर अशी ही आमची संवादाविना असलेली मैत्री निस्वार्थीपणा मुळे टिकून असावी. थोडक्यात ह्या मैत्री च्या बाबतीत ठेविले अनंते तैसेचि रहावे.. हे धोरण ठेऊन मी माझ्या चित्ती समाधान बाळगून आहे!
© वृषाली आठले


*माझी अनवट अलिप्तता*   © वृषाली आठले        मन थेंबाचे आकाश       लाटांनी सावरलेले       मन नक्षत्रांचे रान       अवकाशी...
16/09/2025

*माझी अनवट अलिप्तता*
© वृषाली आठले
मन थेंबाचे आकाश
लाटांनी सावरलेले
मन नक्षत्रांचे रान
अवकाशी अवघडलेले
आपलं मन किती लहरी असतं. कित्येकदा स्वतःच्याच मनाचा अंदाज बांधता येत नाही आपल्याला. नेहेमी सारखं न वागता अगदी अनिश्चित असं काहीतरी वागतं. गेला काही काळ तुफान पाऊस पडला. असं वाटलं पाऊस जीव तोडून कोसळला! तो धो धो कोसळला,तो न थांबता बरसला, त्याने लोकांची गैरसोय केली, त्याने कष्ट करणाऱ्या लोकांना हैराण केलं. पाऊस वेड्या सारखा कोसळला खरा ... अवतीभवती खूप काही घडलं..पण तरीही माझ्या आत मध्ये काहीच घडलं नाही. हा पाऊस मला काहीच देऊन गेला नाही, आणि माझ्या कडून काहीच घेऊन ही गेला नाही. ना माझ्यासाठी तो सुंदर आठवणीं घेऊन आला, ना त्याने आयुष्यातले भरभरून जगलेले क्षण समोर आणले, ना त्याने माझ्या मनाचे हळवे कोपरे उलगडले..अगदी काहीही घडलं नाही. एरवी असं होतं ना...की हा पाऊस जेव्हा असा कोसळतो तेव्हा तो आपल्याला ही हलवतो. कधी खुश करतो, कधी उगीचच धुंद करतो..कधी एखादी सल, एखादं दुःख, किंवा आपल्या मनावरचं एखादं ओझं अलगद वाहून नेतो..आणि आपल्याला मोकळं करतो! पण ह्यावेळी असं काहीच घडलं नाही अशी ही पहिलीच वेळ असावी. काय गंमत आहे आपल्या मनाची..आपल्या मनाला सतत काहीतरी घडत राहावसं वाटत असतं. अगदी चांगलं वाईट, भन्नाट किंवा अगदी साधसं च काही...पण घडायला पाहिजे. नाहीतर उगीच बेचैन होतं मन. आणि काहीतरी घडलं की मग ते कामाला लागतं. ह्यावेळी जरा वेगळा अनुभव होता हा, अगदीच तटस्थपणे मी ह्या कोसळणाऱ्या पावसाकडे बघत होते. कुठून आली ही तटस्थता..हा प्रश्न नाही पडला मला. ही तटस्थता कुठून आली आणि कशामुळे आली ह्याची उत्तरं होती माझ्याकडे. पण का आली ही तटस्थता असं मात्र वाटून गेलं. इतकं तटस्थ वाटायला नको होतं मला असं वाटलं. तो मूळ स्वभाव नाहीये. मग मी बदलतेय का? जर हा बदल चांगला असेल तर काय हरकत आहे! आपल्यातला प्रत्येक माणूस बदलतो, परिस्थितीनी, अनुभवांनी किंवा क्वचित जाणीवपूर्वक ठरवून बदलतो. मला वाटतं मला जाणीवपूर्वक ठरवून बदलायला आवडेल.
आपल्यातल्या प्रत्येकाला ठरवलं तर बदलता येतं. त्यासाठी विचारांची स्पष्टता हवी. आणि अर्थातच भावनांची सुद्धा. गुंतागुंतीच्या भावना मनांत बाळगून सकारात्मक बदल नाही घडवता येत. कधीकधी विचार आणि भावना दोन्ही मधे स्पष्टता असताना, आणि होणारा बदल आपल्या स्वतःसाठी चांगला असतानाही आपण बदलायला धजावत नाही. कारण बदलताना जुनं काहीतरी सुटतं आहे ह्याची हळहळ जाणवत असते.
म्हणजेच अगदी जे आहे ते कुठेतरी सलणारं असलं तरीही आपण ते कुरवाळत बसतो कारण आपल्याला त्यातून मोकळं व्हावंसं वाटत नाही. ह्याचं खरं कारण अचानक आपल्याला रिकामं झाल्यासारखं होतं. आणि हे रिकामं रिकामं वाटणं आपल्याला जास्त त्रास देतं. ही मनस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येते.. ह्या पावसाळ्यात मी तो अनुभव घेतला. पाऊस कितीही मुसळधार कोसळला तरी तो पोचू शकला नाही माझ्या पर्यंत. इतकी अलिप्त झाले मी. आपल्या ही नकळत आपलं मन आपल्यालाच सांभाळत असतं (Coping Mechanism). आणि म्हणून उदास आणि अस्वस्थ व्हायचं नाही. ही मनस्थिती सुद्धा पूर्ण अनुभवायची, जगायची. असे रिकामं वाटण्याचे अनुभव आठवून पहा बरं. .आणि मग त्या रिकामपणाच्या पोकळीत सकारात्मकता भरता येते का पहा. फार सुंदर अनुभूती असते ही पण.
मन काळोखाची गुंफा
मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात
मन देवाचे पाऊल!
ह्या पावसाने मला काही काळासाठी बाकी सगळ्यातून अलिप्त केलं खरं,पण माझं त्या अलिप्ततेतल्या पोकळी बरोबर ही नातं जुळलं. सोपं नसतं ना अलिप्त होणं.
© वृषाली आठले
Counseling Psychologist
Psychotherapist
16/9/2025






श्री कोपेश्वर मंदिर: अद्भुत स्थापत्य आणि ईश्वराचा वास!© वृषाली आठले १५/८/२०२५खिद्रापूर गावातील, कृष्णा नदी च्या पात्राती...
15/08/2025

श्री कोपेश्वर मंदिर: अद्भुत स्थापत्य आणि ईश्वराचा वास!
© वृषाली आठले
१५/८/२०२५
खिद्रापूर गावातील, कृष्णा नदी च्या पात्रातील श्री कोपेश्वर मंदिर बघितलं आणि अक्षरशः आवाक झाले मी. पूर्वी मला मंदिरं पहायला विशेष आवडायचं नाही. सगळ्यात मोठं कारण म्हणजे भाविकांची अतोनात गर्दी..आणि प्रत्यक्ष देवा समोर क्षणभर सुद्धा उभं राहता न येणं. पण जेव्हापासून योगशास्त्र भारतीय तत्त्वज्ञान वगैरे अभ्यास केला तेव्हा पासून मी आवर्जून अशी अनेक मंदिरं पहायला जाते. पण जेव्हा तिथे कुणीच नसेल त्या दिवशी आणि त्याच शांत वेळी जाते.महादेवाच्या मंदिराचं मला का कुणास ठाउक पण आकर्षण वाटतं.आपल्या हिंदू धर्मात शैव आणि वैष्णव हे दोन संप्रदाय आहेत. शैव संप्रदाय शिव म्हणजेच शंकर ह्या देवाला मानतात, आणि वैष्णव संप्रदाय विष्णू म्हणजेच नारायणाला मानतात.
शैव तत्त्वज्ञान ज्ञानाला आणि मुक्ती ला महत्त्व देते, तर वैष्णव तत्वज्ञान भक्ती आणि प्रेमाला महत्त्व देते. त्यांच्या उपासना पद्धती, आणि धार्मिक विधी यामध्ये फरक आहे.
आपल्या कडे महादेवाची अनेक मंदिरे आहेत तसेच विष्णू देवाची सुद्धा आहेत. परंतु महादेव आणि विष्णू देव एकाच मंदिरातील एकाच गाभाऱ्यात मी पहिल्यांदाच पाहिले. श्री शंकराच्या देवळात ते देखील केंद्रस्थानी गर्भगृहात दोन लिंगांचे एकत्रित दर्शन होते. शिव आणि विष्णू एकत्र असणारी अगदी कमी मंदिरे महाराष्ट्रात आहेत. यापैकी एक श्री कोपेश्वर मंदिराचे गर्भगृह आहे. येथील महादेवाचे नाव कोपेश्वर, कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला, दक्ष कन्या सती च्या जाण्याने, विरहाने कापलेला महादेव..आणि त्याची समजूत काढण्याचे काम करणारा विष्णू देव म्हणजे धोपेश्वर. अशा दोन शाळुंखा इथे गर्भगृहात आहेत. गर्भगृहाच्या भिंतींवर १८ लतिकांच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याचा वरचा भाग हा निमुळता होत जाणारा आणि वलयांकित आहे.आणि त्याच्या मध्यभागी झुंबराची रचना आहे. फक्त आतून च नाही तर बाहेरून पण हे मंदिर फार सुंदर आहे. सभामंडप आणि गर्भगृह ह्यांना जोडणारा एक अंतराळ कक्ष आहे. ह्याला खांब नाहीत. इथे भिंतींवर कोरलेल्या असंख्य सुंदर मूर्ती आहेत. आता खूप मूर्ती भग्न झालेल्या आहेत पण तरी सुद्धा त्यातला जिवंतपणा, कलावैभव, कारागिरांचं कौशल्य दाखवतात. देवदेवतांच्या मूर्तीं मध्ये महागणपती, सरस्वती, महिषासुरमर्दिनी,गंगा पार्वती सह श्री शंकर, लक्ष्मी माते सह भगवान विष्णू अशी अनेक शिल्प आणि मूर्ती आहेत.
ह्या मंदिराची निर्मिती १२ व्या शतकात शिलाहार राजवटीत झाली असा उल्लेख आहे. जवळपास ९०० ते हजार वर्ष जुने मंदिर आहे. काळ्याभोर पाषाणातून बनवलेलं हे एक कमाल सुंदर शिल्प आहे. ह्या मंदिराच्या आजुबाजूला जवळ जवळ ५० मैलाच्या परिसरात कुठेही काळया दगडाची खाण नाहीये. म्हणजेच हे मंदिर निर्माण केले ते दूरवर कुठेतरी असलेल्या खाणीतून.. तिथे शिलाखंड पाराखले, घडवले आणि इतक्या दूर मंदिर उभारले असावे. सगळच विशेष! मंदिराची रचना करताना हे मंदिर ९५ हत्तींनी आपल्या पाठीवर उचलून घेतले आहे असे दाखवलेलं दिसतं. ह्या मंदिरात अत्यंत सुंदर सजावट असलेले १०८ खांब आहेत. मंदिराची रचना ताऱ्यांच्या आकाराची आहे. ४ विभागात दिसते.
ह्या मंदिरामध्ये सगळ्यात सुंदर काही असेल तर इथला स्वर्गमंडप! हा स्वर्गमंडप ४८ खांबांवर उभा आहे..गोलाकार, चौकोनी, षटकोनी अष्टकोनी असे अनेक आकार ह्या खांबांवर दिसतात. देवा समोर सादर करायच्या नृत्य, गायन, वादन अशा सेवा सादर करण्याची ही जागा म्हणजे रंगशाळा. मंदिरात करायच्या होम हवनाची ही जागा. ही जागा म्हणजे मोक्ष, म्हणजेच स्वर्ग प्राप्तीचे द्वार..म्हणून स्वर्गमंडप नाव असावं! इतर मंदिरांप्रमाणे ह्या महादेवाच्या मंदिरात नंदी नाही. हे अजून एक वैशिष्ट्य. असे म्हणतात खिद्रापूर पासून १२ किलोमीटर वर कर्नाटकातील यडूर या गावी आहे. तेथे फक्त नंदी चे मंदिर आहे.
श्री कोपेश्वर मंदिर म्हणजे अद्भुत स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे! आपल्या भारतातील संस्कृती, आपल्या कला, आपलं पुरातन स्थापत्यशास्त्र, आपले देव देवता, आपले वेद पुराण, आपली शिल्प, आपली धार्मिक पौराणिक पार्श्वभूमी ह्या अशा अनेक भव्य मंदिरात दिसते. अभिमान वाटतो तेव्हा ह्या सगळ्याचा.सगळं पुन्हा पुन्हा पाहून डोळ्यात आणि मनांत साठवून घेऊन मी मस्त जप करायला बसले तिथे. उठून यावं असं वाटेना, इतकं शांत वातावरण तिथे होतं. स्थिरतेचं महत्व नव्याने जाणवलं.
© वृषाली आठले
Counseling Psychologist Psychotherapist




Address

F/17, Shree Parshwa Industrial Premises, V P Road. Opp Plasma Blood Bank
Dombivli East
421201

Opening Hours

Tuesday 5pm - 9pm
Wednesday 10am - 1pm
Thursday 5pm - 9pm
Friday 10am - 1pm
Saturday 5pm - 9pm
Sunday 10am - 1pm

Telephone

+919769083479

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vrushali Athale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Vrushali Athale:

Shortcuts

Share