27/04/2020
कोरोना आणि समाजाची मानसिकता
जगभरामध्ये कोरोना चे मांडलेले थैमान आणि कोरोना योध्यांचे त्याच्या विरूद्ध चाललेले प्रयत्न हे वाखाणण्याजोगे आहेत. पण काही ठिकाणी यांच योध्यांच्या विरुद्ध घडणाऱ्या घटना बघून वाईट वाटते. हे लोक जीवाचे रान करून आपल्या घरच्यांपासून लांब राहून रुग्णांना सेवा देत आहेत आणि आपण त्याची परतफेड म्हणून त्यांनाच त्रासात टाकत आहे. लोक स्वतःहून पुढे येण्यापेक्षा या गोष्टी लपवून ठेवत आहेत यामुळे कोरोना च्या प्रसाराला हातभार तर लागतच आहे पण तो थांबवण्याच्या प्रयत्नांना पूर्ण यश मिळेना झालेय. काय असेल हे लपवून ठेवायची मानसिकता, का जातात या निर्णयाला लोक?
कारणे बरीच असू शकतात पण एक महत्वाचे कारण आहे तो म्हणजे समाजाचा रुग्णाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि महत्वाची काही कारणे .
1. भीती
जेंव्हा हा आजार आला तेंव्हा पासून एक गोष्ट बघण्यात येत आहे की डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना राहत्या घरातून बाहेर काढले जाते, त्यामागे भीती हे कारण आहेच पण एक गोष्ट लक्षात का येत नाही? की उद्या आपल्यालाच हा आजार झाला तर हेच लोक आपल्याला वाचवणार आहेत हेच लोक आपल्या मदतीला येणार आहेत. हेच लोक आहेत जे स्वतःचा जीव हातावर घेऊन आपल्याला सेवा देतात.
2. बहिष्कार
एखाद्याला कोरोना झाला तर त्याला आणि त्याच्या संपूर्ण घराला वाळीत टाकण्याचा प्रकार पण बघण्यात आला. सरकारने यावर अश्या व्यक्तींना विलग ( quarantine )करायला सांगितले आहे ना की वाळीत टाकायला. याच भीतीने लोक स्वतःहून समोर यायला घाबरतात.
3. हिणवणे
एखाद्याला हा आजार झाला तर त्यांना वाळीत तर टाकलेच जाते पण त्यानंतर लोक काय म्हणतील ? हा एक प्रश्न आहेच, काही जणांच्या चेष्टेचा विषय तर होणार नाही ना आपण ही एक मानसिकता आहे त्यामुळे लोक स्वतःहून समोर यायला घाबरतात, घरगुती उपाय करतात आणि आजार बळावला की मग जीवावर बेतते.
आज सरकारचा एक स्तुत्य निर्णय वाचण्यात आला की अश्या प्रकारे कोणतीही वागणूक जर लोकांना देण्यात आली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि 100 पेक्षा जास्त सोसायटी ना आज नोटस ही देण्यात आली आहे.
कारण, काल HIV आज कोरोना; आजार हे येतात जातात पण मानसिकता?
शेवटी काय तर लोकांनी मानसिकता बदलली आणि लोकांप्रती सहानुभूती दाखवली तर हा लढा थोडासा सोयीस्कर होईल, जगात कोठेही नसलेली ही समस्या आपल्याच येथे आहे. या योध्याना, रुग्णांना बाहेरच्या देशात सन्मानाची वागणूक दिली जाते तशी आपल्या येथे पण दिली जावी एवढीच अपेक्षा.
घरी राहा, सुरक्षित राहा.
वैद्य. शिवकृष्ण विलास दिवटे
चिंचवड
7304560220