19/02/2024
आज (१९ फेब्रुवारी) युगपुरुष, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती...
१९ फेब्रुवारी १६३० या दिवसाचे मोल फारच आगळेवेगळे आहे. या दिवशी शिवनेरी गडावर जिजामातेच्या पोटी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. लहानपणापासून शिवरायांच्या मनावर जिजामातेने जे संस्कार केले आणि शहाजीराजांनी जे साहाय्य केले त्याचीच परिणती ‘युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज’ घडण्यात झाली. त्यांच्या ठायी असलेल्या अनमोल गुणवैशिष्ट्यांमुळेच आज इतक्या वर्षानंतरही त्यांचे स्मरण स्फूर्तिदायी ठरते.
छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे खरे राजे. त्यांनी जुलमी सुलतानशाहीविरुद्ध लढा देण्यासाठी संख्येने अल्प असलेल्या मावळ्यांना एकत्र करून त्यांच्यामध्ये एतद्देशीयांचे म्हणजे रयतेचे राज्य निर्माण करण्याची जिद्द निर्माण केली. देव, देश, धर्म, संस्कृतीच्या रक्षणासाठी त्यांना प्रेरित केले. त्यांना अनेक जिवलग सवंगड्यांची साथ लाभली, ज्यांनी स्वराज्यासाठी स्वत:चे प्राण तृणवत मानले. त्याच बळावर हिंदवी स्वराज्य स्थापन झाले आणि शिवराय ‘छत्रपती’ बनले.
राज्यकारभार करतानाही त्यांनी दूरदृष्टीने धोरण अवलंबिले. रयतेचे कल्याण आणि रक्षण करताना त्यांनी शेती, व्यापाराला उत्तेजन दिले. संघटन कौशल्य, स्त्रियांचा सन्मान आणि आदर, उत्कृष्ट नेतृत्व, नियोजन कौशल्य, संयम, दूरदृष्टी, गुणग्राहकता, निष्कलंक चारित्र्य या गुणांमुळे पिढ्यानपिढ्या अनेकांच्या मनात ते जिवंत राहिले आहेत. उण्यापुऱ्या ५० वर्षांच्या अल्प आयुष्यात त्यांनी केलेले कार्य अजोड आहे. म्हणूनच त्यांना ‘युगपुरुष’ संबोधले जाते. त्यांचे कार्य, त्यांची महत्ता अवर्णनीयच...
छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त शतश: प्रणाम आणि मानाचा मुजरा...
#शिवराय #युगपुरुष #छत्रपतीशिवाजीमहाराज #जिजामाता #शहाजीराजे #शिवनेरी #जयंती #प्रणाम #अभिवादन