20/07/2026
ह्यावर्षी मी आणि राधाने ‘वुमन्स सर्कल’ ची सुरुवात केली. बघता बघता ३ सर्कल्स झाले. चौथं सर्कल २५ जुलै ला होईल.
पहिल्या सर्कल वेळी आमच्या दोघींच्याही मनात धाकधूक होती. माझ्यासाठी तशी ही संकल्पना अनोळखी होती. पुणे-मुंबई ला अशा एक्टिव्हिटीज भरपूर होत असतात. पण आपल्याकडे माझ्या माहितीनुसार तरी पहिल्यांदाच असं काहीतरी होणार होतं. त्यामुळे आम्हीही अंदाज घेत घेतच ह्याची सुरुवात केली.
इतक्या अनोळखी संकल्पनेला कसा प्रतिसाद येईल ह्याची आम्हालाही कल्पना नव्हती. पण पहिल्या सर्कल पासून स्त्रियांनी जो आमच्यावर विश्वास दाखवलाय तो खरच कमाल आहे. सुरुवातीला बऱ्याच जणींना खूप प्रश्न होते, खूप शंका होत्या, अर्थातच ज्यांनी कधी अटेंड केल नाहीये त्यांच्यासाठी अजूनही असणार आहेत. तर ह्या पोस्ट मधून त्या clear करायचा प्रयत्न करूया अस वाटलं…
तर,
-‘वुमन्स सर्कल’ म्हणजे नक्की काय असतं?
आपण दर महिन्याच्या एका शनिवारी भेटतो. वेळ असते संध्याकाळी ५-७. प्रत्येक सर्कल ला एक थीम/ विषय असतो. विषय अर्थातच मानसिक आरोग्याशी निगडित असतो. ह्या २ तासात वेगवेगळ्या एक्टिव्हिटीज, बॉडी मूवमेंट ह्या सगळ्यामधून आपण त्या विषयाला समजून घ्यायचा प्रयत्न करतो. त्यावर बोलतो. अनुभव शेयर करतो. त्याच बरोबर ही एक अशी जागा सुद्धा आहे जिथे स्त्रियांना त्यांच्या सगळ्या वैयक्तिक जबाबदाऱ्यातून २ तासासाठी तरी मोकळीक मिळते. शांतता मिळते. आणि स्वतःशी आणि इतरांशीही संवाद साधता येतो. कुणाला काहीच न करता, कशातही भाग न घेता, फक्त शांत बसून रहायचं असेल तर तीही मोकळीक आहे.
-ज्यांना काही मानसिक त्रास आहे/ तणाव आहे त्यांच्या साठीच फक्त वुमन्स सर्कल आहे का?
अजिबात नाही. वुमेन्स सर्कल हे मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी असतं. जसं आपण शारीरिक स्वास्थ्यासाठी व्यायाम करतो, पौष्टिक आहार घेतो, तसंच काहीसं हे आहे. ‘मी वुमन्स सर्कल अटेंड केलं म्हणजे मला लोक मानसिक दृष्ट्या आजारी समजतील’ असं अजिबात नाहीये. उलट आजारी पडू नये, ह्यासाठी हा उपक्रम आहे.
-हे लेक्चर किंवा वर्कशॉप असतं का?
नाही. मी एक Psychiatrist म्हणून आणि राधा एक Psychologist म्हणून आम्ही हे कंडक्ट जरी करत असलो तरी पण इथे आमचं काम लेक्चर देणं किंवा वर्कशॉप घेणं नसतं. किंवा हे कन्सल्टेशन सुद्धा नाहीये.
-आम्ही प्रोफेशनल म्हणून नक्की काय करतो?
सगळ्या जणींसाठी एक सुरक्षित आणि मोकळं वातावरण निर्माण करायची आम्ही जबाबदारी घेतो. हे १.३०- २ तास आम्ही त्या त्या वेळच्या थीम नुसार अशा प्रकारे डिज़ाइन करतो जेणेकरून विषयाला धरूनच सगळ्या गोष्टी होतील. ठरलेल्या विषयाच्या खोलवर जाऊन सगळ्यांना आपापल्या परीने तो विषय समजून घेता येईल असा प्रयत्न करतो. तो विषय फार जड न करता, पण त्याचबरोबर त्याचं गांभीर्य कमी न करता हे सगळं साध्य करायचा आमचा प्रयत्न असतो. त्या २ तासातून त्यांना घरी काहीतरी घेऊन जाता यावं हीच इच्छा असते. सध्या आम्ही एकेक भावनेवर काम करतोय. आधीच्या सर्कल्स मधे ‘राग’ आणि ‘आनंद’ झाले. येणाऱ्या सर्कल मधे ‘भीती’ ह्या भावनेला समजून घ्यायचा प्रयत्न करू.
-मी आधीची सर्कल अटेंड केली नाहियेत. मी आता करू शकते का?
नक्कीच. पुढच्या सर्कलचा आधीच्या झालेल्या सर्कलशी फारसा संबंध नसतो. कारण प्रत्येक वेळी थीम वेगळी असते. थीम रिपीट होत नाही. दरवेळी एक्टिव्हिटीज, शेअरिंग वेगळं असतं. दरवेळी वेगळा अनुभव. येणारे लोकही वेगळे असू शकतात. सगळ्यांना प्रत्येक महिन्यात अटेंड करणं जमतं असं नाही. त्यामुळे तुम्हाला वाटतं ते कुठलही सर्कल तुम्ही अटेंड करू शकता. कितीही सर्कल्स अटेंड करू शकता. प्रत्येक वेळी फी भरून रेजिस्टर करणं आवश्यक आहे. दरवेळी थीम आणि रजिस्ट्रेशन ची माहिती आम्ही शेयर करतोच.
-वुमन्स सर्कल का सुरू केलं? ह्याचा उद्देश काय आहे?
आपल्या समाजात मानसिक स्वास्थ्य आणि आजार ह्याबद्दल खूप गैरसमज आहेत. नक्की डॉक्टर किंवा थेरेपिस्ट ची मदत कधी आणि कशासाठी घ्यायची ह्याबद्दल खूप संभ्रम आहे. भीती आहे. बेसिक मधेच खूप घोळ आहेत. वुमेन्स सर्कल मधून आम्ही आजारांवर बोलत नाही आहोत. ही त्याच्याही आधीची एक स्टेप आहे. कारण प्रॉब्लम सोडवण्याआधी तो स्वतःमध्ये ओळखता येणं, तो आहे हे मान्य करणं गरजेचं असतं. रोजच्या आयुष्यातल्या मानसिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या गोष्टींवर काम करणं, त्यांच्याबद्दल माहीत करून घेणं, त्या ओळखायला शिकणं, हाताळायला शिकणं हा ह्या उपक्रमाचा उद्देश आहे. स्त्रियांना त्यांच्या मानसिक स्वास्थ्याकडे बघण्यासाठी, त्यावर विचार करण्यासाठी घटकाभर वेळ मिळावा आणि ह्या निमित्ताने जागरूकता निर्माण व्हावी हाच प्रयत्न आहे. इथे त्या कुणाची आई, बहीण, बायको, किंवा मुलगी नसतात. त्या एक माणूस असतात. त्यांनाही ह्या निमित्ताने त्यांच्यातल्या माणसाचा विसर पडू न द्यायचा हा प्रयत्न आहे.
तर असे काही प्रश्न बऱ्याच जणींच्या मनात होते. बऱ्याच दिवसांपासून त्याबद्दल लिहायचं होतं. अजूनही काही प्रश्न/ शंका असतील तर नक्की विचारा. 😊
पहिल्या वुमन्स सर्कल वेळी जागा ठरवणे हा एक मोठा प्रश्न होता. कारण जागा शांत असावी, सुरक्षित वातावरण असावं या अगदी बेसिक गरजा होत्या सर्कल साठी. तो प्रश्न नशिबाने लगेच सुटला. प्रत्येकवेळी ही जागा सजवणे, थीम नुसार सगळ्या एक्टिव्हिटीज चा विचार करणे, ह्या सगळ्याच गोष्टीत आम्हालाही मजा येतीये. आम्हालाही दरवेळी खूप काही शिकायला मिळतय.
आत्तापर्यंत ज्यांनी हे सर्कल्स अटेंड केलेत आणि ज्या ज्या लोकांचा ह्यासाठी हातभार लागलाय त्या सगळ्यांचे मनापासून आभार!
अजून खूप काही करायचं डोक्यात आहे…त्यासाठी तुमच्यासारख्यांकडूनच बळ मिळतय. ❤️🙏🏼
-डॉ. तन्वी