04/07/2026
दिनांक : ०४ जुलै २०२६
स्थळ : आंबोडा गाव, तालुका व जिल्हा वर्धा, महाराष्ट्र
पुलाअभावी पावसाळ्यात आंबोडा गावाचा संपर्क तुटतो; शेतकरी आणि बौद्ध मठाकडे जाणारा मार्ग बंद
वर्धा जिल्ह्यातील आंबोडा गावाजवळील नदीवर आजपर्यंत पूल बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर गावाचा बाहेरील भागाशी संपर्क पूर्णपणे तुटतो. याचा सर्वाधिक फटका ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना बसतो.
या मार्गावरूनच गावातील शेतकरी आपल्या शेतात जातात तसेच बौद्ध मठ (मॉनॅस्ट्री) येथे जाण्यासाठीही हाच एकमेव रस्ता आहे. मात्र पावसाळ्यात नदीला पूर आल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीत जाता येत नाही आणि बौद्ध मठाकडे जाणारा मार्गही पूर्णपणे बंद होतो. त्यामुळे शेतीची कामे, धार्मिक कार्ये आणि दैनंदिन जीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होते.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या पुलासाठी अनेक वर्षांपासून महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने मागणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिले असून स्थानिक आमदारांनाही याबाबत पत्र देण्यात आले आहे. मात्र आजपर्यंत पुलाचे बांधकाम सुरू झालेले नाही. दरवर्षी पावसाळा आला की हीच गंभीर समस्या पुन्हा निर्माण होते. नदी ओलांडताना अनेक अपघात झाले असून काही नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.
आंबोडा गावातील सर्व ग्रामस्थांची महाराष्ट्र शासनाला नम्र विनंती आहे की, या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन नदीवर कायमस्वरूपी पुलाचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करावे. त्यामुळे ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी तसेच बौद्ध मठाकडे जाणाऱ्या नागरिकांना सुरक्षित आणि अखंड वाहतूक सुविधा उपलब्ध होईल.
– संदीप पी. दुपारे