31/07/2020
कोरोना: रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे एक आव्हान
अलीकडील एक चर्चिला जाणारा गंभीर व भीतीदायक विषय म्हणजे 'कोरोना' हा सांसर्गिक आजार होय. बातम्या पाहताना, वर्तमानपत्र वाचताना तसेच व्हाट्सअँप, फेसबुक किंवा इतर सोशल मीडियावर त्याचे अस्तित्त्व आपणास जाणवत राहते. जागतिक आरोग्य संघटना (WHO) व आयुष (AYUSH ) मंत्रालय वेळोवेळी लोकहितास्तव कोरोना बाबत सूचना जारी करत असतात. मग त्या मास्क वापरण्याबाबत, वारंवार साबणाने हात धुण्याबाबत असो किंवा सोशल डिस्टंसिन्ग बाबत असो. एकंदरीत काय तर घराघरात भीतीदायक वातावरण आहे.
हा लेख लिहितांना जगामध्ये १ कोटी ७२ लाख व्यक्ती कोरोना बाधित झाले आहेत. त्यापैकी साधारण ६.५ लाख व्यक्ती मृत पावले आहेत, तर १ कोटी २ लाख व्यक्ती हे पूर्णपणे बरे झालेले आहेत. म्हणजे साधारण ४ % व्यक्ती ह्यात मृत पावले आहेत. भारताबाबत बोलायचे झाल्यास समुह संसर्ग (community spread) हे सुरु झालेले आहे. एकूण १५ लाखांवर लोक कोरोना बाधित आहेत त्यापैकी ९ लाख ७० हजार व्यक्ती पूर्णपणे बरे झालेले आहेत तर ३३ हजार पेक्षा जास्त व्यक्ती हे मृत पावलेले आहेत. साधारण मृत्यूदर ३% आहे. एव्हाना सर्व वाचकांना कोरोना कशामुळे होतो, त्याची काय लक्षणे दिसतात ह्याबाबत विविध माध्यमातून माहिती मिळाली आहे. ह्या सर्व गोष्टींची चर्चा करण्यापेक्षा निसर्गोपचाराच्या सहाय्याने आपण स्वतःची रोग प्रतिकारशक्ती वाढवून कोरोनाला दोन हात लांब कसे ठेऊ शकतो ते पाहू या.
सर्व प्रथम आयुष मंत्रालयाने काही खबरदारीचा उपाय म्हणून रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काही सल्ले दिलेली आहेत ते आपण पाहू या:
अ. होमिओपॅथी: अर्सेनिकम अल्बम ३० ( Arsenicum Album ३०) सकाळी उपाशी पोटी सलग तीन दिवस रोज एक डोस. जो पर्यंत कोरोनाचे प्रादुर्भाव आहे तो पर्यंत हा डोस दरमहिन्याला एकदा घेण्याचा सल्ला दिलेला आहे. हा डोस वाचकांनी होमिओपॅथी डॉक्टरांकडून घेतल्यास ते विश्वसनीय औषध असेल.
आ. आयुर्वेद :
- रोज सकाळी च्यवनप्राश १० mg ( १ चहाचा चमचा). मधुमेही रुग्णांनी शुगर फ्री च्यवनप्राश घ्यावे .
- हरबल चहा/ काढा : तुळशी, दालचिनी, मिरी, आलं / सुंठ , मनुके यांचा चहा किंवा काढा दिवसातून एक ते दोन वेळा घेणे. जर पित्ताचा ( Acidity) त्रास झाल्यास ते कमी उकळणे . तरी पित्ताचा त्रास झाल्यास घेऊ नये.
- सुवर्ण दूध: हळद अर्धा चहाचा चमचा १५० ml गरम दुधात घालून दिवसातून १ ते २ वेळा पिणे.
- भाज्यां शिजवतांना हळद , जीरा , कोथिंबीर , लसूण ह्यांचा वापर करणे.
निसर्गोपचार व रोगप्रतिकारशक्ती :
आता निसर्गोपचाराने रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवायची ते आपण पाहू या. निसर्गोपचार ही एक प्राचीन उपचार पद्धती आहे. ह्या उपचारपद्धतीमध्ये औषधांचा वापर न करता निसर्गात असलेल्या घटकांचा सुसंगत व तर्कसंगत वापर करून रोगाचे मूळ कारण दूर करुन रोगनिवारण केले जाते. ह्याचा प्राचीन ग्रंथात व वेदात उल्लेख सापडतो. आजच्या सुपरफास्ट जगात व्यक्तीस ही उपचार पद्धती व्यक्तीस वेळखाऊ व निरुपयोगी वाटते. प्रत्येकास 'पी हळद व हो गोरी' ह्या उक्तीप्रमाणे झटपट व फास्ट परिणाम देणारे उपचार पद्धती हवे असतात.
आपण तोंडावाटे अन्न व पाणी ग्रहण करतो, तसेच श्वसनावाटे हवा आत घेतो. अन्नाचे व पाण्याचे चयापचय होऊन त्यातून शरीरास लागणारे पाणी, जीवनसत्वे, खनिजे, ग्लुकोज व इतर पौष्टीक रसायने शरीरास मिळतात. ह्या चयापचयाच्या क्रियेमध्ये बरेचसे टाकाऊ पदार्थ तयार होतात ज्याची शरीरास गरज नसते व असे पदार्थ म्हणजेच विजातीय पदार्थ (विषद्रव्य), हे शरीराबाहेर टाकण्याचे गरजेचे असते. हे विजातीय घटक मल व मूत्राद्वारे शरीराबाहेर टाकण्याचे कार्य शरीरातील वेगवेगळे अवयव करत असतात. तसेच काही विषद्रव्ये हे घामावाटे शरीराबाहेर काढण्याचे काम देखील होत असते. तसेच शरीरास कार्य करण्यास शुद्ध ऑक्सिजन वायूची गरज असते. श्वसनावाटे आपण हवा आत घेतो, फुफ्फुसामध्ये ह्यातील ऑक्सिजन घेऊन कार्बन डाय ऑक्साईड सोडले जाते. तसेच प्रदूषणामुळे नको असलेले घटक उदा. कार्बनकण व काही घातक वायू ह्याप्रक्रीयेमध्ये फुफ्फुसात येतात. ते शरीराबाहेर टाकण्याचे गरजेचे असते. तर असे टाकाऊ पदार्थांचा शरीराबाहेर टाकण्याचे कार्य जेव्हा नीट होत नाही तेव्हा त्याचा शरीरात प्रमाणाबाहेर संचय होतो. ते विषाचे कार्य करू लागते. परिणामी व्यक्ती आजारी पडते.
निसर्गोपचाराच्या ह्या तत्त्वानुसार ज्या वक्तीमध्ये विषद्रव्ये कमी प्रमाणात आहे त्यांची संरक्षक प्रणाली ही शरीरात येणाऱ्या सर्व जंतूंचा नाश करते. मग ते हवे मार्फत, पाण्यामार्फत किंवा अन्नामार्फत येवो. यामुळे अश्या व्यक्ती अश्या स्थितीतही निरोगी राहतात. ह्याउलट ज्या शरीरामध्ये विषद्रव्यांचा साठा हा अतिरिक्त असतो अश्या शरीरामध्ये जंतूंचे पोषण व झपाट्याने वाढ होते. ह्यांची रोग प्रतिकार शक्ती कमकुवत असते म्हणून व्यक्ती आजारी पडते.
थोडक्यात निसर्गोपचाराच्या तत्त्वानुसार आजार हे जंतूने होत नाही. हे वाचण्यास थोडेसे विचित्र वाटेल. टायपिंग चूक झाले असावे असे वाटेल. नाही ! हे तुम्ही बरोबर वाचताय. सध्याच्या कोरोना ह्या साथीच्या आजारात तुम्ही काही बातमी वाचले असाल की काही लोकांच्या टेस्ट केल्यावर त्यांच्या शरीरात अँटी बॉडी आढळून आले. याचा अर्थ त्यांना कोरोना हा आजार होऊन गेला व ते त्यातून १००% बरे देखील झाले आहेत पण हे त्यांना माहीत नाही. हा त्यातील एक प्रकार आहे.
आता आपण थोडक्यात आहार व निसर्गोपचाराच्या काही क्रिया पाहू या ज्या आपणास रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतील .
1. आहार :
- गुळवेलचा खोडाचा काढा किंवा गुळवेलच्या पानाचे सेवन रोज सकाळी उपाशी पोटी (पाणी पिल्यानंतर) केल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते
- दिवसाची सुरवात हंगामी (seasonal) फळाने करावे . जोपर्यंत भुक लागत नाही तो पर्यंत खाण्याची वेळ झाली म्हणुन खाऊ नये. शरीराची भाषा ऐका .निसर्गाने शरीराची व त्यांतील प्रणालीची रचना फार सुरेख केली आहे. सर्व प्रणालीमध्ये feedback system आहे व ते तुम्हास सांगत असतात. तसेच भुक लागल्यावर भुकेची भावना होते. जर भूक लागलेलं समजत नसेल तर, दिवसाची सुरवात फळाने करणे तसेच दिवसातून फक्त दोन वेळा जेवणे . ह्या व्यतिरिक्त फक्त पाणी अथवा लिंबू पाणी पिणे ह्यामुळे चयापचयाची क्रिया सुधारून सर्वसाधारण रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
- व्हिटॅमिन ‘सी’: आहारात व्हिटॅमिन ‘सी’ चे प्रमाण वाढवावे. आवळा, लिंबू , मोसंबी, संत्रा, टोमॅटो, किवी , स्ट्राबेरी ह्या फळांमध्ये / फळभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ‘सी’ चे प्रमाण मुबलक आहे. ह्या सर्वांमध्ये सर्वात स्वस्त व अधिक प्रमाण उपलब्ध म्हणजे लिंबू होय. दिवसातून ३ ते ४ वेळा लिंबू पाण्याचे सेवन आपण करू शकता. तसेच लहान मुलांना साखर घालून लिंबू शरबत देऊ शकता.
- व्हिटॅमिन ‘डी’ : सुदैवाने भारतात सूर्यप्रकाश हे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे . रोज सकाळी २० मिनिटे सूर्यप्रकाश शरीरावर घेतल्यास शरीरात व्हिटॅमिन ‘डी’ ची निर्मिती होते व शरीराची गरज भासते. ह्या व्यतिरिक्त साल्मोन माश्याचे तेल व अंडी हेदेखील व्हिटॅमिन ‘डी’ चे चांगले स्त्रोत आहेत.
2. नाकाद्वारे उपचार: ह्यामुळे नाक व सायनस ची पोकळी पर्यंतचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत होते.
- प्रतिमर्श नस्य: - दोन्ही नाकपुड्या मध्ये सकाळी व संध्याकाळी बोटांनी तिळाचे तेल / खोबरेल तेल किंवा तूप लावावे.
- जलनेती: - जलनेतीमुळे नाकाद्वारे होणार संसर्ग कमी होण्यास मदत होते. हलके कोमट पाण्यात थोडंसं मीठ टाका. ते जलनेती पात्रात घ्या. मान तिरकी करून एका नाकपुडीतून जल आत सोडून दुसऱ्या नाकपुडीतून बाहेर येऊ द्या. हा प्रकार करतांना नाक साफ असावे व श्वसनक्रिया तोंडाने करावे . हे येत नसेल तर योग तज्ज्ञांकडून शिकून घेणे गरजेचे आहे. चुकीच्या पद्धतीने केल्यास पाणी सायनसच्या पोकळीत जाऊन जोरात ठसका अथवा झटका बसून डोक्यात झिणझिण्या येऊ शकतात. हा प्रकार दिवसातून किमान दोन वेळा करणे.
3. मुखाद्वारे उपचार :
- तेल घोळवणे ( Oil Pulling ):- ह्यामध्ये तोंडामध्ये खोबरेल तेल अथवा तिळाचे तेल घेऊन ते पाच मिनिटापर्यंत घोळवणे व नंतर थुकून देणे . हे तेल प्यायचे नाही. चुकून पिलं गेल्यास नुकसान नाही.
- गरम पाण्याच्या गुळण्या:- घसा निरोगी ठेवण्यासाठी सोसवेल इतक्या मिठाच्या गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. हे दिवसातून दोन वेळा म्हणजे सकाळी व संध्याकाळी करावे. घसा खवखवत असेल किंवा कोरडा खोकला असेल तर लवंग व खडीसाखरची मिक्सर मध्ये पावडर करून त्याचे दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन करावे.
वाफ घेणे:- नाकाने वाफ घेतल्याने नाकापासून सायनस कॅव्हिटी चे आरोग्य सुधारते व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
सरकारने वेळोवेळी जाहीर केलेल्या सूचनांचे सर्वांनी योग्य पालन करावे. मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे व विनाकारण खरेदी साठी बाहेर पडू नये . काहीजण म्हणतील भाज्या, फळभाज्या व फळे ह्या शिवाय आहाराचे कसे होणार ? अश्यावेळी आहारात पुढील गोष्टींचा समावेश करावा.
- मोड आलेली कडधान्ये : कडधान्ये हे बरेच दिवस साठवता येते. मोड आलेल्या कडधान्यात व्हिटॅमिन अ, ब, क व इ चे प्रमाण मुबलक असते. ह्यामध्ये प्रोटीनची मात्रा देखील चांगली असते त्यामुळे ते शरीरास पौष्टिक आहे. तसेच ह्यामध्ये नैसर्गिक तंतूंचे प्रमाण अधिक असल्यामुळे पचन क्रिया सुलभ होण्यास मदत होते.
- धिरडं/ थालीपीठ: वेगवेगळे धान्याची पिठं हे प्रत्येक घरात असतात. नसतील तर त्या धान्याचे मिक्सर मध्ये बारीक करून पीठ बनवता येईल . त्या सगळ्या पिठाचं एकत्रित पणे केलेलं धिरडं / थालीपीठ हा देखील एक पौष्टिक आहार आहे. ह्यामध्ये कांदा देखील घालता येईल.
- दुग्धजन्य पदार्थ: सायीचे विरजण लावून त्यापासून मिळणारे लोणी व ताक हे आरोग्यदायी आहेत. दही व ताक हे pro-biotic असल्यामुळे अन्न पचण्यास उत्कृष्ट.
- पातळ भाजी: भाज्यांचा तुटवडा असल्यामुळे विविध डाळींची आमटी. तसेच बदल म्हणून त्यात एखादा बटाटा वापरून बनवलेल्या पातळ भाजीचे सेवन. शेंगदाण्याची आमटी.
- गुळाचे सेवन: कधी कधी वरील भाज्यांचा कंटाळा आल्यास पोळी बरोबर/ भाकरी बरोबर गुळाचे सेवन हे आरोग्यदायी आहे.
- संपूर्ण वेळ घरात असल्यामुळे बऱ्याच जणांना विनाकारण भूक लागल्यासारखे वाटण्याची शक्यता आहे व अतिरिक्त खाण्याने चयापचयाची क्रिया बिघडून पोट बिघडण्याची शक्यता असते. म्हणून पचनक्रिया ठीक राहण्यासाठी पोटभर न जेवता मितआहार घ्यावा. जेवण्याच्या वेळा कमीत कमी असाव्यात
- घरातल्या घरात पुढील व्यायाम करावे :- सूर्यनमस्कार, घरच्याघरी चालणे, कपालभाती ( सराव असेल तर), अनुलोम विलोम प्राणायाम. ज्यांना जिमच्या व्यायामाची सवय असेल त्यांनी स्वतःचे वजन वापरून, तसेच बाटलीत पाणी भरून वजनाचे व्यायाम करावे.
ह्या झाल्या सर्वसाधारण घरच्या घरी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी छोट्या टिप्स. जर आपणास ताप, खोकला, स्नायूदुखी , थकवा व श्वसनास त्रास होत असेल तर त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा , जेणेकरून कोरोनावर पुढील योग्य उपचार घेण्यासाठी आपले डॉक्टर आपणास मार्गदर्शन करतील .
शुभ चिंतन
प्रदीप शेटे
योगा व नॅचरोपॅथिस्ट
शंका समाधानासाठी : व्हाट्स अप ९४२३५५३९९८