20/06/2026
हार्मनी हेल्थ नाशिक तर्फे बालमधुमेहींचा गौरव
बालवयात होणारा टाईप १ मधुमेह हा खरंतर दुर्धर आजार. जगण्यासाठी रोज ३-४ इन्सुलिन इंजेक्शन, आहारावरील बंधने आणि सततच्या रक्त तपासण्यात ह्या चिमुकल्यांचे बालपण हरवून जाते. ह्या गोड योध्यांच्या आयुष्याची गोडी कमी न होऊ देता, त्यांना प्रेरित करून त्यांच्या रक्त-शर्करेचे नियोजन करण्याचा प्रयत्न हार्मनी हेल्थ क्लिनिक तर्फे नेहेमीच केला जातो. रक्तशर्करा चांगली नियोजित केल्यास शैक्षणिक, कला, क्रीडा इत्यादी विविध क्षेत्रात ही मुले उत्तम कामगिरी करतात. अश्याच गुणी मुलांचा सत्कार "हार्मनी T१D चॅम्पियन्स" ह्या कार्यक्रमात करण्यात आला. स्वतःचा मधुमेह सांभाळून मातृत्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या मातांचा देखील सत्कार करण्यात आला. शिवाय ह्या चिमुकल्यांनी विविध गुणदर्शन सादर केले. कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक बाल हार्मोनरोगतज्ञ् डॉ तुषार गोडबोले ह्यांनी केले. पुरस्कारार्थींचा सत्कार हा नाशिक बालरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. अरुण गचाले, पदाधिकारी डॉ अतुल बोन्डे, डॉ स्नेहल धांडे , तसेच जेष्ठ बालरोगतज्ञ् डॉ ममता अग्रवाल आणि डॉ माणकलाल चोपडा ह्यांच्या हस्ते झाला. केतकी पुजारे ह्यांनी आहाराबद्दल तर डॉ यशपाल गोगटे ह्यांनी कुटुंबातील सभासदांचे योगदान ह्यावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कु. रिद्धी देशपांडे तर आभारप्रदर्शन श्री तेजस ठोंबरे ह्यांनी केले. गुरुदक्षिणा हॉल मध्ये संपन्न ह्या कार्यक्रमात १५० हुन अधिक बालमधुमेही आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हजेरी लावली.