06/03/2021
उन्हाळा आलाय!
त्यात काय विशेष?नेहमीच येतो तो! बरोबर आहे. तरी उन्हाळ्याचे म्हणून काही खास आनंद असले उदा.आंबा, मोगरा, वाळा, वळीवाचा पाऊस --- ऋतू बदलताना नवे जंतू आपल्याला विशेष करून लहान मुलांना हटकून त्रास देतात.कोरोना पण त्यातलाच एक.
आता मी कोरोनाबद्दल लिहून तुम्हाला त्रास देणार नाहीये. नको एवढी माहिती नको इतकी सारखी डोळ्यासमोर नको म्हटले तरी येताच आहे. पण सध्या कोरोना मुळे बाकीच्या गोष्टी घाबरून मागे सरकून बसल्या आहेत.साध्याच पण त्रासदायक ठरणाऱ्या गोष्टींबद्दल आता सांगणार आहे.
उन्हाळ्याच्या साथीच्या आजारांपैकी गोवर, कांजिण्या, गालगुंड, विषमज्वर (टॉयफॉईड), कावीळ यांच्यावर लसींनी आपण बऱ्यापैकी मात केलीय. पण तरी सगळेच आजार लसींनी टाळता येण्यासारखे नसतात. शिवाय लसी घेतलेल्या नसतील तर या आजारांचा मोठा धोका आत्ताच आहे. या लसी सरकारच्या मोफत योजनेत मिळत नाहीत. स्वखर्चाने घ्यावा लागतात. घेतलेल्या असाव्यात. या आजारांवर उपाय आहेत पण ते टाळणं सोपं आणि स्वस्त आहे.
आजारांबद्दल नाही पण उन्हाळ्यासाठी आरोग्य संभाळण्यासाठीच्या काही टीपा इथे देते. जितकं मूल लहान तितकं ते चटकन आजारी पडतं . मग तो आजार कोणताही असो. त्याच्या शरीराची पाण्याची, कॅलरीजची गरज वाढते. नेमकी भूक कमी झाल्यानं मूल खात पीत नाही. क्वचित उलट्याही करतं. मूल खात नसेल तर त्याची पाण्याची गरज आणखी वाढते. म्हणून ही गरज प्रथम पुरवली पाहिजे. साखर मीठ युक्त पाणी आग्रहपूर्वक वारंवार पाजलं पाहिजे. त्याला शू स्वच्छ पाण्यासारखी भरपूर होणं महत्वाचं. लहान मूल स्वतः पाणी मागू शकत नाही हे लक्षात घ्यावं.आग्रहानं पुन्हा पुन्हा विचारावं.मूल
आजारी नसलं तरी,या उन्हामुळं आणखी काय काय होतं ? उन्हामुळे हवेत कोरडेपणा येतो पंख्यामुळे किंवा AC मुळे तो वाढतो. यामुळे त्वचेतून घामाच्या रूपाने पाणी वाया जाते. म्हणून त्वचा कोरडी पडते. ओठ कोरडे पडतात. त्यांना चिरा पडतात. नाक कोरडे पडते.नाकातून रक्त येतं ,शू कमी होते, शी कडक होऊ लागते, मुलं ओठावरून जिभा फिरवू.लागतात. नाकात बोटं घालू लागतात. अंग खाजवू लागतात. शी रोज, मऊ होईनाशी होते. कडक झाली तर शी करायला टाळू लागतात. पोट दुखतेची तक्रार करू लागतात या शिवाय मोठं लक्षण नाकाचा घुळणा फुटणं आणि शी तून दुखून रक्त पडणं. ही प्राथमिक लक्षणं खरं तर शरीराला पाणी कमी पडतंय हे सुचवत असतात. पण आपलं दुर्लक्ष झालं अन हे पाणी पाजून सुधारल नाहीतर पुढ दोन मोठ्या समस्या समोर येतात एक धावायला लावणारी तर दुसरी दीर्घकाळ त्रास देणारी, आजार व्यतिरिक्त सहज टाळता येणारे
हे त्रास जवळजवळ सगळ्यांनाच थोड्याफार प्रमाणात होणारे यासाठी द्रव पदार्थांचा प्रमाण वाढवलं पाहिजे. मुलांना पाणी प्यायची आठवण करत ते त्यांना हाताशी उपलब्ध करून दिलं पाहिजे. दर तासाला थोडंथोडं पाणी पीत राहिलं तर अधिक चांगलं.म्हणजे मुलं खूप तहानेनं व्याकुळ होऊन ढसाढसा एकदम खूप पाणी पिणार नाहीत. सरबतं, फळांचा रस, ताक. अशी व्हरायटी असली तर आणखीच चांगलं.
थोड्या मोठ्या मुलांना त्यांची सरबतं बनवायला शिकवलं तर पालकांचं कामही होईल आणि मुलांना नवी कौशल्यही येतील. ही एक चांगली ऍक्टिव्हिटीच होऊ शकेल. पहा करून रोज वेगळं सरबतं सर्वांसाठी बनवायचं.सर्वांना नेऊन पाजायचं. पालकांनी पण पाणी पिण्याची सवय करावी. मुलांच्या ते लक्षात येतं आणि त्यांना सुद्धा चांगली सवय लागते.
आणखी एक गोष्ट,पाणी थोडं गार असेल तर जास्त प्यालं जातं ,यावर दुमत नसावं. मोठ्यांनी थंडगार पाणी प्यायचं आणि मुलांना कोमट मचूळ पाणी द्यायचं हे ठीक नाही. त्यांना पण गार पाणी नकोका? एका तांब्याला फडकं ओलं करून लावून ठेवलं तर पाणी चांगलं गार होतं ,मुलं थोडं जास्त पितात असा अनुभव आहे. आज एवढं पुरे!