02/03/2026
केस स्टडी : बाल्यावस्थेतील आघात आणि त्याचे प्रौढ वयातील परिणाम
एक चाळीस वर्षीय स्त्री समुपदेशनासाठी आली. तिची मुख्य तक्रार अशी होती की तिची प्रचंड चिडचिड होत होती, सतत इतरांशी वाद होत होते आणि कामात अजिबात रस वाटत नव्हता. वरवर पाहता तिची कौटुंबिक परिस्थिती उत्तम होती — सुस्थितीत कुटुंब, आर्थिक स्थैर्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि शारीरिक आरोग्यही चांगले होते. तरीही ती मानसिक त्रास अनुभवत होती.
या मानसिक ताणामागील कारण शोधण्यासाठी मानसशास्त्रीय निदान महत्त्वाचे ठरते. यासाठीच विविध मानसशास्त्रीय चाचण्या (Psychometric Tests) उपयोगी पडतात. या चाचण्यांमुळे व्यक्तीच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज घेता येतो.
या स्त्रीची एक प्रोजेक्टिव्ह टेस्ट घेतली असता तिच्या बालपणातील अनेक शारीरिक व मानसिक छळाच्या अनुभवांचे संकेत मिळाले. त्यानंतर सखोल समुपदेशन करताना विचारलेल्या प्रश्नांना तिने प्रामाणिक उत्तरे दिली. त्यातून असे स्पष्ट झाले की ती लहानपणापासूनचे अनेक आघात मनात दडवून ठेवून होती. सध्या जाणवत असलेला ताण, चिडचिड आणि भावनिक अस्थिरता ही भूतकाळातील त्या घटनांशी निगडित होती.
यावरून हे स्पष्ट झाले होते की तीचे बालपणीचे आघात तीच्या प्रौढ वयातील वर्तनातून व भावनिक प्रतिसादात दिसून आले .
चाइल्डहुड ट्रॉमा म्हणजे काय?
बाल्यावस्थेतील आघात म्हणजे लहानपणी अनुभवलेले असे त्रासदायक, नकोसे किंवा वेदनादायक अनुभव, जे व्यक्तीच्या सामाजिक, शैक्षणिक, मानसिक आणि भावनिक विकासावर नकारात्मक परिणाम करतात. हे परिणाम वरवर दिसत नसले तरी ती खोलवर रुजलेले असतात आणि पुढे वर्तनातून व्यक्त होतात.
लोकांचे सामान्य समज
लोक अनेकदा बाल्यावस्थेतील आघाताला फक्त तात्पुरते दुःख किंवा वाईट आठवण म्हणून दुर्लक्षित करतात. मात्र प्रत्यक्षात त्याचा व्यक्तिमत्व विकासावर गंभीर परिणाम होऊ शकतो, जसे की:
1. बदल स्वीकारण्यात अडचण, व्यक्तिमत्वात कठोरपणा.
2. नकारात्मक विचारसरणी आणि सतत तक्रार करण्याची प्रवृत्ती.
3. स्वतःलाच दुर्दैवी समजण्याची भावना.
4. छोट्या गोष्टींवर अतिप्रतिक्रिया देणे — राग, शिवीगाळ, वस्तू फेकणे इत्यादी
चाइल्डहुड ट्रॉमाचे वास्तव परिणाम
बाल्यावस्थेतील आघात असलेल्या व्यक्तींमध्ये पुढील लक्षणे दिसू शकतात:
1. त्रासदायक घटनांचा सामना करण्यात अडचण.
2. भावना व्यक्त करण्यात किंवा भावनिक नाते जोडण्यात अडथळे.
3. वाईट घटनांचे सतत पुनःस्मरण होणे.
4. सतत धोक्यात असल्याची भावना.
5. कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण.
6. स्वतःलाच दोष देण्याची प्रवृत्ती व अपराधीपणा.
7. भावनांचे नियमन करण्यात अडचण.
8. लज्जा किंवा अपराधीपणाची भावना.
9. सतत मानसिक व शारीरिक तणाव.
10. झोपेच्या समस्या, भयावह स्वप्ने.
11. आत्मसन्मान कमी होणे व स्व ओळख गोंधळ.
12. नात्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यात अडचणी.
13. स्वतःपासून किंवा वास्तवापासून भावनिक विलगीकरण.
---
निष्कर्ष
बाल्यावस्थेतील आघात व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम करू शकतो. मात्र योग्य मानसोपचार, समुपदेशन आणि कुटुंबीयांचे समर्थन मिळाल्यास व्यक्ती हळूहळू या आघातांवर मात करू शकते आणि संतुलित जीवन जगू शकते.
---
मेघा खेर पालकर
Clinical Psychologist and Counsellor