02/08/2026
“स्वरूपबोध फाऊंडेशन” आणि “कृतार्थ – Care with Compassion” यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "जगू आनंदे" हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा संवादात्मक कार्यक्रम १ ऑगस्ट रोजी “तिरूपती गार्डन” येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात "तिरूपती गार्डन"च्या समिती सदस्यांनी डॉ. मकरंद ठोंबरे यांचा परिचय करून देत केली.
डॉ. मकरंद ठोंबरे यांनी हा कार्यक्रम पारंपरिक व्याख्यानाच्या स्वरूपात न घेता, उपस्थित ज्येष्ठांशी मनमोकळ्या संवादातून उलगडला. त्यामुळे संपूर्ण वातावरण अगदी आपुलकीचं आणि सहजसंवादी झालं.
संवादाची सुरुवात जेष्ठ नागरिकांमध्ये होणारे शारीरिक, मानसिक आणि पर्यायाने निर्माण होणारे भावनिक बदल याविषयाने झाली. त्याचबरोबर आपल्या आनंदाची किल्ली अनेकदा आपल्या स्वतःच्या हातातच असते आणि ती शोधण्यासाठी स्वतःकडे पाहणं, स्वतःला समजून घेणं, स्वीकारणं आणि स्वतःसाठी वेळ देणं का आवश्यक आहे, यावरही विचारमंथन करण्यात आलं.
दैनंदिन आयुष्यातील अनेक सोपी आणि प्रत्येकाला जवळची वाटणारी उदाहरणे देत, आपल्या जबाबदाऱ्या समतोलपणे सांभाळताना स्वतःवर प्रेम करणं, स्वतःची काळजी घेणं आणि शक्य तितकं स्वावलंबी राहण्याचं महत्त्व त्यांनी अतिशय सहजपणे मांडलं. स्वतःवर प्रेम करणं आणि स्वार्थी होणं यामधला फरक आणि त्याबद्दलचे गैरसमज देखील समजावून देण्यात आले.
या संपूर्ण संवादामध्ये उपस्थित ज्येष्ठांनी अतिशय उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यांनी स्वतःचे अनुभव मांडले, प्रश्न विचारले आणि चर्चेत सक्रियपणे सहभागी होत कार्यक्रम अधिक समृद्ध केला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली. तसेच सहभागी ज्येष्ठांकडून लेखी आणि व्हिडिओ स्वरूपातील अभिप्रायही घेण्यात आला. त्यांच्या सकारात्मक प्रतिक्रिया आणि मनापासून व्यक्त केलेल्या भावना आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरतील.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी “तिरूपती गार्डन”च्या समिती सदस्यांनी डॉ. मकरंद ठोंबरे आणि "कृतार्थ"च्या संपूर्ण टीमचा सन्मान करून आभार व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वृशाली रानडे यांनी सुरुवातीपासून घेतलेले प्रयत्न आणि सहकार्य अतिशय मोलाचे ठरले. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
तसेच "तिरूपती गार्डन"च्या समितीचे विशेष आभार. त्यांनी कार्यक्रमासाठी उत्कृष्ट नियोजन, आवश्यक सुविधा आणि संपूर्ण कार्यक्रमादरम्यान दिलेले सहकार्य यामुळे हा उपक्रम अत्यंत सुरळीत आणि यशस्वीरीत्या पार पडला.
या कार्यक्रमाला “कृतार्थ”च्या वतीने डॉ. मकरंद ठोंबरे, गायत्री वैद्य, सोनाली राणे, शर्वरी देवधर आणि माधुरी पोतनीस उपस्थित होते. तसेच तेजश्री गोगटे यांनीही कार्यक्रमात सहभागी होऊन आपली उपस्थिती दर्शवली.
"जगू आनंदे" हा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर ज्येष्ठांच्या अनुभवांना, विचारांना आणि आनंदी आयुष्याच्या शक्यतांना स्पर्श करणारा एक सुंदर संवाद होता. अशा उपक्रमांमधून अधिकाधिक ज्येष्ठांपर्यंत पोहोचत, त्यांच्यासोबत समजून घेणारी, सन्मानाची आणि सकारात्मकतेची नाती निर्माण करण्याचा “कृतार्थ”चा प्रयत्न यापुढेही असाच सुरू राहील.